मुंबई-
आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आपली वेगळी छाप पाडलेली असतानाही आज अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. असंच एक नाव आहे ते म्हणजे फिरकीपटू अमित मिश्रा. आयपीएलमध्ये अमित मिश्रा आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. संघासाठी मोलाचं योगदान दिलेलं असतानाही यंदाच्या लिलावात अमित मिश्राला दिल्लीच नव्हे, तर इतर कोणत्याही संघानं बोली लावली नाही. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालक पार्थ जिंदाल यांनी ट्विटरवर अमित मिश्राचं त्यानं दिलेल्या योगदानाचं कौतुक करत तो नेहमीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग राहणार असल्याचं म्हटलं आहे.
अमित मिश्रासाठी यावेळी बेस प्राइज १.५ कोटी इतकी ठेवण्यात आली होती. अमित मिश्राचं आयपीएल करिअर पाहता त्यानं आतापर्यंत १५४ सामन्यांत १६६ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पार्थ जिंदाल यांनी अमित मिश्रा याला दिल्ली कॅपिटल्स संघासोबतच ठेवणार असल्याचं ट्विटरवर जाहीर केलं आहे. "आयपीएलचा महान खेळाडून अमित मिश्रानं इतक्या वर्षांमध्ये जे काही योगदान दिलं आहे त्याला आम्ही सॅल्यूट करतो. अमित मिश्रा याला कोणत्याही भूमिकेत किंवा इतर कोणत्याही पद्धतीनं संघासोबत ठेवता येईल याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. त्याची साथ आणि सल्ला नक्कीच संघासाठी उपयोगी ठरेल. मिशी भाई दिल्ली कॅपिटल्स संपूर्ण आयुष्यभर तुझीच टीम आहे", असं ट्विट पार्थ जिंदाल यांनी केलं आहे.