Mumbai Indians Full Squad, IPL 2022: पाचवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या मेगा लिलावात अखेरच्या क्षणी मोठा फासा टाकत संघात तगड्या खेळाडूंना दाखल केलं आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सचे संघ मालक मुकेश अंबानी, निता अंबानी, प्रशिक्षक झहीर खान, महेला जयवर्दने हातचं राखून बोली लावताना पाहायला मिळाले होते. पहिल्या दिवसात अवघे तीन खेळाडू मुंबईनं विकत घेतले. यात इशान किशनसाठी तब्बल १५.२५ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत मोठा दाव खेळला. पण आज मुंबई इंडियन्सनं वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी झोळी रिती केली.
ऑक्शनच्या पहिल्या दिवशी केवळ इशान किशन व डेवॉल्ड ब्रेव्हिस असे दोनच खेळाडू खरेदी करून बटव्यातल्या ४८ कोटींपैकी केवळ १८.२५ कोटी मुंबईने खर्च केले होते. त्यांनी खूप प्लान करून प्रत्येक खेळाडूसाठी पैसे राखून ठेवले. पहिल्या दिवशी इशानचं नाव येताच मुंबईने वाटेत ती किंमत मोजली आणि आज जोफ्रा आर्चरसाठी ८ कोटी ओतले. त्यात त्यांनी टीम डेव्हिडलाही घेत हार्दिक पांड्याची उणीव भरून काढली आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज व राजस्थान रॉयल्सचा माजी जोफ्रा आर्चर याचे नाव येतात मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपये मोजले.
आयपीएलच्या या पर्वात जोफ्रा खेळणार नसला तरी मुंबई इंडियन्सने टायमल मिल्सला ताफ्यात घेत यंदाच्या पर्वातील टेंशन दूर केले आहे. इंग्लंडचाच मिल्स डेथ ओव्हरसाठी उपयुक्त गोलंदाज आहे आणि त्यानं १५६ ट्वेंटी-२० त १७६ विकेट्स नावावर केल्या आहेत. जयदेव उनाडकट याचीही निवड करून संघात एक डावखुरा जलदगती गोलंदाज घेतला आहे. उनाडकटच्या नावावर आयपीएलच्या ८६ सामन्यांत ८५ विकेट्स आहेत. हार्दिक पांड्याची उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी संघात टीम डेव्हिड याला घेतले.
डेवॉल्ड ब्रेव्हिसला ताफ्यात घेत किरॉन पोलार्डसोबत एक खमका फिनिशर मुंबई इंडियन्सने मिळवला. एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला आणि त्याच्याचसारखी ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या ब्रेव्हिसला त्याचे मित्र व सहकारी Baby AB नावाने बोलवतात... १८ वर्षीय ब्रेव्हिसने वेस्ट इंडिज येथे झालेल्या Under-19 World Cup स्पर्धेत त्याने ६ सामन्यात सर्वाधिक ५०६ धावा केल्या.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).