IPL 2022 Mega Auction च्या पहिल्या दिवशी नियोजित वेळेनुसार मेगालिलावाला सुरूवात झाली. काही खेळाडूंची बोली लागली तर काही खेळाडूंना कोणी वाली लाभला नाही. ही प्रक्रिया सुरू असतानाच IPL ऑक्शनर ह्यू एडमीड्स अचानक जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉटेलमध्ये दाखल करण्यात आले आणि पुढील लिलाव प्रक्रिया चारू शर्मा यांनी सांभाळली. आज दुसऱ्या दिवशीही चारू शर्मा यांनीच प्रक्रिया पुढे सुरू ठेवली. पण दुसऱ्या दिवशी शेवटच्या टप्प्यात मात्र ह्यू एडमीड्स परतले आणि साऱ्यांनीच त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.
IPL ऑक्शनच्या शेवटच्या सत्रात अवघ्या काही खेळाडूंवर बोली लागणं शिल्लक होतं. त्यावेळी चारू शर्मा यांनी ह्यू एडमीड्स यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी थेट ह्यू एडमीड्स लिलाव प्रक्रिया पुढे नेणार असल्याचेही जाहीर केले. ही घोषणा होताच ह्यू एडमीड्स स्वत: हॉलमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यांच्या एन्ट्रीला साऱ्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केलं. ह्यू एडमीड्स यांच्या लढाऊवृत्तीला सलाम करत साऱ्यांनी त्यांचं छानपैकी स्वागत केलं. त्यानंतर ह्यू एडमीड्स यांनी अतिशय खुबीने आपलं कार्य चोख पार पाडत कार्यक्रमाची सांगता केली. पाहा व्हिडीओ-
ह्यू एडमीड्स यांना काय झालं होतं?
ह्युज एडमेड्स हे ऑक्शन सुरू झाल्यावर सुमारे अडीच तासांनी अचानक जमिनीवर कोसळले. काही वेळाने IPL व्यवस्थापनाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. त्यांना नक्की काय झालं होतं असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. मात्र, त्यांना Postural Hypotension चा त्रास झाल्याचं IPL कडून स्पष्ट केलं. तसेच, ते ठणठणीत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं.
ह्यू एडमीड्स नक्की कोण आहेत?
मूळचे ब्रिटनचे असलेले ह्यू एडमीड्स हे प्रसिद्ध ऑक्शनर आहेत. कलाकुसरीच्या अमूल्य वस्तू, आलिशान विंटेज कार आणि चॅरिटी अशा विविध गोष्टींसदर्भातील लिलाव प्रक्रिया खुबीने पार पाडण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी आतापर्यंत २.७ अब्ज पौंडांपेक्षा अधिकच्या रकमेचे ऑक्शन प्रक्रिया पार पाडली आहे. एडमेड्स यांनी एरिक क्लॅप्टनच्या ८८ गिटारचा लिलाव केला होता. त्या लिलावात एकूण ७२ लाख ३८ हजार ६२४ जमा करण्यात आले होते. तसेच, एडमेड्स यांनी २०१६ मध्ये जेम्स बाँडच्या स्पेक्टर चित्रपटातील डॅनियल क्रेगच्या अॅस्टन मार्टिन DB10 चा £ २४ लाख ३४ हजार ५०० मध्ये लिलाव केला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एडमेड्स हे लंडनमधील नेल्सन मंडेला यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या वेळी झालेल्या लिलाव सोहळ्यातही ऑक्शनर होते.