IPL 2022 Mega Auction मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने रविचंद्रन अश्विनला खरेदी केले. मार्की खेळाडूंच्या यादीत असलेल्या रविचंद्रन अश्विनची मूळ किंमत २ कोटी रूपये होती. त्यावरून त्याच्यावर बोली लावण्यात आली आणि राजस्थानच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. राजस्थान रॉयल्सने त्याला ५ कोटींच्या बोलीवर संघात घेतलं. अश्विन राजस्थानच्या संघात गेल्यानंतर त्याच्या रकमेवरून नव्हे तर वेगळ्याच गोष्टीवरून चर्चा रंगली.
दुश्मन बने दोस्त!
रविचंद्रन अश्विनने IPL 2019 च्या स्पर्धेत राजस्थानच्या संघाविरूद्ध मंकडिंग करत जोस बटलरला बाद केलं होतं. त्यानंतर राजस्थानच्या संघाने आणि काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. जोस बटलरही नाराज होता. पण यंदाच्या स्पर्धेत अश्विन आणि बटलर दोघेही एकाच संघात खेळणार या कल्पनेने सोशल मीडियावर दमदार चर्चा रंगली. रवि अश्विनने व्हिडीओच्या माध्यमातून संघाचे आभार मानले. तसेच, अश्विन संघात असल्याचे बटलरला काहीही अडचण नसल्याचं संघाने सांगितलं. त्यानंतर जोस बटलरनेही व्हिडीओच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलं. अश्विन तुझं संघात स्वागत... मी आता क्रीजच्या आतच उभा राहीन, असं तो मजेशीर पद्धतीने म्हणाला.
लिलावाच्या पहिल्या दिवसअखेर राजस्थानचे सर्व खेळाडू - राजस्थान रॉयल्स : देवदत्त पड्डीकल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करीयप्पा