Chennai Super Kings Full Squad, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जची (CSK) पहिल्या वर्षापासून असलेली 'चिन्ना-थला' (लहान भाऊ- मोठा भाऊ) जोडी म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची जो़डी तुटली. चेन्नईच्या संघाने महेंद्रसिंह धोनीला संघात रिटेन केलं होतं. त्याबरोबरच ऋतुराज गायकवाड, रविंद्र जाडेजा आणि विदेशी स्पिनर मोईन अली यांनाही संघात कायम ठेवलं होतं. पण सुरेश रैनाला मात्र संघातून करारमुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवस चाललेल्या मेगा लिलावात सुरेश रैना दोन वेळा बोलीसाठी उपलब्ध झाला पण त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी हा धक्काच होता. पण रैनाचा फॉर्म पाहता चेन्नई आणि इतर संघांचा निर्णय़ योग्यच असल्याचं मत काही चाहत्यांनी मांडलं.
चेन्नईच्या संघाने यंदाच्या लिलावात पुन्हा एकदा दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांना खरेदी केलं. शक्य तितक्या खेळाडूंना मूळ किमतीवर विकत घेण्याकडेच चेन्नईचा कल होता. पण ऑलराऊंडर दीपक चहरसाठी चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बोलीयुद्ध झालं. अखेर चेन्नईने चहरला १४ कोटी रुपयांना परत विकत घेण्यात यश मिळवले. तो लिलावातील दुसरा सर्वात महागडा खरेदी ठरला.
चेन्नईच्या संघाने दीपक चहर वगळता अंबाती रायुडूवर ६ कोटी ७५ लाखांची बोली लावली. तर रॉबिन उथप्पा २ कोटींच्या किमतीत त्यांना मिळाला. इतर सर्व खेळाडूंसाठी चेन्नईला फारशी झुंज द्यावी लागली नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात ख्रिस जॉर्डन हा इंग्लिश अष्टपैलू खेळाडू त्यांना ३ कोटी ६० लाखांमध्ये मिळाला.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).