IPL 2022 Mega Auction मध्ये दुसऱ्या दिवशी Mumbai Indians संघाच्या व्यवस्थापनाने दुसऱ्या दिवशी खेळाडूंचा लिलाव सुरू झाल्यापासून तब्बल दीड-दोन तासानंतर पहिला खेळाडू विकत घेतला. मुंबईच्या ताफ्यात वेगवान गोलंदाजांची उणीव होती. जसप्रीत बुमराह आणि बासील थंपी यांच्याशिवाय आणखी गोलंदाजांची गरज असताना एकेकाळचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला जयदेव उनाडकट लिलावासाठी आला. त्यावेळी मुंबईने चतुराईने त्याच्यावर बोली लावली आणि त्याला अतिशय स्वस्तात म्हणजे १ कोटी ३० लाखांच्या बोलीवर संघात दाखल करून घेतलं. अपेक्षित डावखुरा वेगवान गोलंदाज संघात आल्याने संघमालक नीता अंबानी यांच्याही चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.
मुंबईच्या संघाकडे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट असा गोलंदाजीचा ताफा होता. पण ट्रेंट बोल्टला करारमुक्त केल्यापासून मुंबईच्या गोलंदाजीची धार बोथट झाल्याचं दिसत होता. यंदाच्या लिलावात मुंबईने काही गोलंदाजांवर बोली लावायचा प्रयत्न केला होता. पण शिल्लक रक्कम पाहता त्यांना फारशी बोली लावणं शक्य होतं नव्हतं. पण जयदेव उनाडकटला मात्र फारशी बोली लागली नाही. बोली लावण्यासाठी थोडीशी झुंज झाली असली तरी मुंबईला अगदी स्वस्तात २ कोटींपेक्षाही कमी भावात जयदेव उनाडकट मिळाला. IPL 2018 च्या लिलावात जयदेववर चक्क ११.५० कोटींची बोली लागली होती. तो त्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता.
जयदेव उनाडकटचा आतापर्यंतचा लिलाव प्रवास
२०१४ - २.८० कोटी (दिल्ली)२०१५ - १.१० कोटी (दिल्ली)२०१६ - १.६० कोटी (कोलकाता)२०१७ - ३० लाख (पुणे)२०१८ - ११.५० कोटी (राजस्थान)२०१९ - ८.४० कोटी (राजस्थान)२०२० - ३ कोटी (राजस्थान)२०२२ - १.३० कोटी (मुंबई)