Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सलग दुसऱ्या दिवशी लिलाव सुरू आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लाएम लिव्हिंगस्टोन याला दुसऱ्या दिवशी आतापर्यंत ११.५० कोटींची सर्वाधिक बोली मिळाली आहे. त्याला पंजाब किंग्सने ( Punjab Kings) आपल्या ताफ्यात घेतले. पण, याच लिलावात भारताच्या युवा प्रतिभावान खेळाडूंवरही बोली लागलेली दिसत आहे. पहिल्या दिवशी टॉप टेन महागड्या खेळाडूंमध्ये सहा भारतांचा समावेश होता. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने नुकताच वर्ल्ड कप जिंकला आणि त्यामुळे त्या संघातील खेळाडूंवर कोण किती बोली लावते याची उत्सुकता होती.
भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवून पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. पण, या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार यश धुल याला दिल्ली कॅपिटल्सने ५० लाखांत खरेदी केले. चेन्नई सुपर किंग्सने राजवर्धन हंगर्गेकरसाठी १.५० कोटी मोजले. मॅच विनर विकी ओस्तवाल अनसोल्ड राहिला. अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास घडवणाऱ्या राज बावाला ( Raj Bawa) मात्र २ कोटीचा भाव मिळाला. सनरायझर्स हैदराबादने राज बावासाठी बोली लावण्यास सुरुवात केली आणि २० लाखांहून ४० लाखांपर्यंत गेल्यानंतर मुंबई इंडियन्सने एट्री घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा अंबानी विरुद्ध काव्या मारन हा सामना पाहायला मिळाला. या दोघांच्या भांडणात राज बावाची किंमत २ कोटींपर्यंत गेली आणि त्यानंतर पंजाब किंग्सनं उडी घेत स्टार गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले...
कोण आहे राज बावा?
- १२ नोव्हेंबर २००२मध्ये हिमाचल प्रदेश येथे जन्मलेल्या राज बावा खेळाडूंच्या कुटुंबीयातील आहे. त्याचे आजोबा तारलोचन बावा हे १९४८ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे सदस्य होते. राज ५ वर्षांचा असताना आजोबांचे निधन झाले. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ४-० असा विजय मिळवला होता, त्यामध्ये एक महत्वाचा गोल हा तारलोचन यांचा होता.
- राजचे वडील सुखविंदर बावा हे हरयाणाच्या कनिष्ठ हॉकी संघाचे सदस्य होते. १९८८मध्ये त्यांचा १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या कॅम्पमध्येही निवड झाली होती. पण, स्लिप डिस्कमुळे त्यांनी २२ व्या वर्षी कोचिंगला सुरुवात केली. राज बावा याला डान्स करायला आवडतं आणि त्याला अभिनेता बनायचे होते. पण, वडिलांसोबत क्रिकेट मॅच पाहता पाहता तोही याच्या प्रेमात पडला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ५ विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. २००६ मध्ये अन्वर अलीने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. राज बावाने आज ३१ धावांत निम्मा संघ बाद करून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. U19WorldCupFinalमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.
- आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात एकाच स्पर्धेत एकाच खेळाडूने डावात १५०+ धावा आणि सामन्यात पाच विकेट्स घेण्याची ही भारतीय खेळाडूची दुसरी वेळ ठरली होती. यापूर्वी १९८३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी असा पराक्रम केला होता. राज बावाने यूगांडाविरुद्धच्या लढतीत १०८ चेंडूंत नाबाद १६२ धावा केल्या होत्या.