IPL 2022 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कर्णधाराच्या शोधात आहे. विराट कोहलीनं ( Virat Kohli) टीम इंडियाचे कर्णधारपद सोडताना RCBच्या नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी IPL 2022 साठी संघात विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी) यांना कायम राखले आणि आता शिल्लक असलेल्या ५६ कोटींतून त्यांना कर्णधारपदाचा उमेदवारासह मजबूत संघबांधणी करायची आहे.
Mega Auction साठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. RCBसह कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स हेही संघ या पर्वात नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे या तीनही फ्रँचायझी श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) ला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी नक्की उत्सुक असतील. अय्यरनं मेगा
ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याला आपल्या संघाचा कर्णधार करावा यासाठी RCB, KKR व PBKS शर्यतीत आहेत. काही फ्रँचायझींनी त्याला ऑफरही दिल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात तो महागडा खेळाडू ठरला तर आश्चर्य वाटायला नको.भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा यानंही त्याच्या यू ट्युब चॅनेलवर हाच अंदाज बांधला. तो म्हणाला,''कोलकाता किंवा बंगळुरू या दोन फ्रँचायझींपैकी एकाचा श्रेयस अय्यर हा कर्णधार बनेल. पंजाब त्याचा विचार करतील असे वाटत नाही. मला काहींनी सांगितले की RCBनं मेगा ऑक्शनमध्ये अय्यरसाठी २० कोटी राखून ठेवले आहेत. त्यामुळे यंदाच्या ऑक्शनमधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. इशान किशनलाही ही संधी होती, परंतु तो कर्णधारपदाच्या शर्यतीत नाही. ''
सर्वात महागडा परदेशी खेळाडूबाबत सांगताना आकाश चोप्रानं दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा याचं नाव घेतलं. तो म्हणाला, कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक किंवा डेव्हिड वॉर्नर हे तीन परदेशी खेळाडू सर्वाधिक भाव खातील.