3 Players to Watch out for IPL 2022 Mega Auction : IPL 2021 मध्ये चेन्नईच्या संघाने शाहरूखच्या कोलकाता नाईट रायडर्सला धूळ चारून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला म्हाताऱ्यांचा संघ म्हणून हिणवलं जात होतं. IPL 2020 मध्ये त्यांच्या संघाची कामगिरी अतिशय खराब होती. पण गेल्या हंगामात त्यांनी धडाकेबाज पुनरागमन केलं आणि संघाला चौथं विजेतेपद मिळवून दिलं. धोनीच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक वयस्क खेळाडू होते पण जुनं ते सोनं ही उक्ती या खेळाडूंनी सिद्ध करून दाखवली. आता IPL 2022 साठी दोन नव्या संघांसह एकूण १० संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. सर्व संघांना समान प्रतीचे खेळाडू संघात घेता यावेत यासाठी प्रत्येक संघाला आपल्याकडे जास्तीत जास्त पाच खेळाडूच संघात कायम ठेवण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आता उर्वरित सर्व खेळाडू मेगा लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. यात काही खेळाडू वयस्क असल्याने त्यांना करारमुक्त करण्यात आलं आहे. पण टी२० क्रिकेटचा विचार केल्यास हे जुने-जाणते खेळाडू खऱ्या अर्थाने सोन्यासारखे ठरू शकतात. पाहूया ते निवडक खेळाडू-
सुरेश रैना - या यादीतील पहिलं नाव म्हणजे मिस्टर IPL सुरेश रैना. चेन्नईच्या संघाला अनेकदा धडाकेबाज विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचे योगदान दिले आहे. IPL च्या इतिहासात सुरेश रैना हा सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहे. गेल्या दोन हंगामात त्याने फारशी उल्लेखनीय कामगिरी केलेली नसली तरी त्याचा अनुभव संघांसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे रैनावर महालिलावात मोठी बोली लागू शकते. अनेक वर्षांपासून तो क्रिकेट खेळत असल्याने त्याला खेळातील बारकावे आणि खेळाडूंची बलस्थानं माहिती आहेत. त्याने गुजरात लायन्स संघाचं प्रतिनिधित्व या आधी केलं आहे. त्यामुळे नव्या दोन संघांपैकी अहमदाबादचा संघ त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकतो अशी चर्चादेखील रंगली आहे.
आर. अश्विन - यादीतील दुसरं नाव म्हणजे आर. अश्विन.. अश्विन मैदानात गोलंदाजी करत असेल तर कसोटी असो किंवा टी२० सामना असो, त्याची गोलंदाजी पाहण्यासारखी असते. त्याशिवाय, अश्विन काही इतर गोष्टींमुळेही चर्चेत असतो. त्याचा मंकडिंगचा किस्सा चांगलाच गाजला होता. त्यानंतर नुकताच पिचवरील डेंजर झोन जवळून गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्नदेखील चांगलाच चर्चिला गेला. अशा परिस्थितीत अश्विनला यंदाच्या लिलावात खूप चांगली बोली लावून विकत घेतलं जाऊ शकतं. अश्विनची भारतातील कामगिरी अतिशय चांगली आहे. तशातच गेल्या दोन वर्षे युएईमध्ये रंगलेली IPL स्पर्धा यंदा पुन्हा भारतात खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत अश्विनसारखा हुकूमी एक्का नक्कीच अनेक संघांच्या 'बकेट लिस्ट' मध्ये असणं स्वाभाविक आहे.
शिखर धवन - दिल्लीच्या संघाने अश्विनसोबतच आणखी एका अनुभवी खेळाडूला संघातून करारमुक्त केलं, तो खेळाडू म्हणजे भारताचा यशस्वी सलामीवीर शिखर धवन. शिखर धवनने गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात रोहित शर्मासोबत एक यशस्वी सलामीवीर म्हणून कामगिरी बजावली आहे. मधल्या काळात शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आणि त्यानंतर त्याला संघात स्थान मिळणं काही अंशी अवघड होऊन बसलं. पण दिल्ली कॅपिटल्स संघातून खेळताना त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. संघात केवळ ठराविक खेळाडूच कायम राखणं शक्य होतं त्यामुळे त्याला संघातून करारमुक्त करण्यात आले. पण लिलावामध्ये शिखर धवनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेणं हे कोणत्याही संघासाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही.