IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : वानखेडे स्टेडियमवर आज विचित्र प्रकार पाहायला मिळाला. पॉवर कट मुळे पहिल्या तीन षटकांत DRS ही सुविधाच उपलब्ध नव्हती आणि त्याचा फटका चेन्नई सुपर किंग्सला बसला. फॉर्मात असलेला डेवॉन कॉनवे ( Devon Conway ) चुकीच्या पद्धतीने बाद झाला आणि या धक्क्यातून CSKला सावरताच आले नाही. मुंबई इंडियन्सच्या ( MI) गोलंदाजांनी नंतर सुरेख कामगिरी केली आणि चेन्नईचा डाव गुंडाळला. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) एकटा भिडला आणि त्याने CSKला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.
डावाच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅनिएल सॅम्सने CSKचा ओपनर डेव्हॉन कॉनवे याला LBW केले. पण, चेंडू यष्टींना चकवून जात असल्याचे दिसत होते, मात्र पॉवर कटमुळे कॉनवेला DRS घेता आला नाही आणि त्याला माघारी जावे लागले. चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने CSK ला तिसरा धक्का देताना रॉबिन उथप्पाला LBW केले. याहीवेळेस DRS घेता न आल्याने उथप्पला माघारी जावे लागले. तीन षटकं DRS शिवाय खेळ झाल्याचा चेन्नईला खूप मोठा फटका बसला. फॉर्मात असलेला कॉनवे ( ०) व रॉबिन उथप्पा ( १) हे या तांत्रिक बिघाडाचे बळी ठरले. चौथ्या षटकानंतर पॉवर आली आणि DRS सुरू झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही ( ७) बाद झाला आणि महेंद्रसिंग धोनीला पाचव्या षटकातच मैदानावर यावे लागले.
अंबाती रायुडू हा नेहमीच वानखेडेवर खेळतो आणि येथे त्याने १०००च्या वर धावा केल्या आहेत. आज तो डाव सारवेल असे वाटले होते, परंतु रिली मेरेडिथने त्याला बाद केले आणि CSKचा निम्मा संघ २९ धावांवर तंबूत परतला. सलग तिसऱ्या पर्वात मुंबई इंडियन्सविरुद्ध CSK ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या. शिवम दुबे चांगला खेळत होता, परंतु मेरेडिथच्या बाऊन्सरवर अपर कट मारण्याच्या प्रयत्नात तो १० धावांवर बाद झाला. इशान किशनने भन्नाट कॅच घेतला. धोनी व ड्वेन ब्राव्हो या अनुभवी जोडीने काहीकाळ CSK ची पडझड थांबवली, परंतु कुमार कार्तिकेयने ही जोडी तोडली. ब्राव्होचा ( १२) अफलातून झेल तिलक वर्माने टिपला. पुढच्याच चेंडूवर सिमरजीत सिंग (०) पायचीत झाला. चेन्नईची अवस्था ८ बाद ८० अशी झाली.
महिशा थिक्सानालाही (०) रमणदीप सिंगने बाद केले आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या धोनीकडे ही पडझड पाहण्यापलीकडे काहीच उरले नाही. डॅनिएल सॅम्सने ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. १६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात CSK ने शेवटची विकेट गमावली. चेन्नईचा संपूर्ण संघ ९७ धावांवर तंबूत परतला. धोनी ३६ धावांवर नाबाद राहिला. ( पाहा IPL 2022 - MI vs CSK सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )