IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील ज्या सामन्याची प्रतीक्षा सर्वांना होती तो मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( MI vs CSK) सामना होत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रवींद्र जडेजा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) संधी देतील अशी शक्यता होती, परंतु सचिन तेंडुलकरच्या मुलाला अजूनही प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. आजच्या सामन्यासाठी MI चा किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) मैदानावर उतरला, तेव्हा CSKचा ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) त्याच्या पाया पडला. पण का?
आयपीएल २०२२मध्ये या MI व CSK या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय... पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकलेला आहे. त्यामुळे एकीकडे अन्य संघ प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी लढत असताना मुंबई-चेन्नई आतापासूनच आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आजच्या सामन्यातून रिली मेरेडिथ व दिल्लीचा २१ वर्षीय फिरकीपटू हृतिक शोकीन यांनी आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. डॅनिएल सॅम्सही संघात परतला आहे. चेन्नईच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत. ड्वेन प्रेटोरियस आणि मिचेल सँटनर यांना ख्रिस जॉर्डन व मोईन अली यांच्याजागी स्थान दिले आहे.
ब्राव्होने का पकडले पोलार्डचे पाय?किरॉन पोलार्डने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पोलार्डने १२३ वन डे, १०१ ट्वेंटी-२० सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने वन डेत २७०६ आणि ट्वेंटी-२०त १५६९ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर एकूण ९७ विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणारा पोलार्ड फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. १० एप्रिल २००७मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तत्पूर्वी २००८मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री मारली होती. २०२२मध्ये भारताविरुद्ध तो अखेरचा वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळला होता. त्याच्या या निवृत्तीने सर्वांनाच धक्का बसला होता. या घोषणेनंतर पोलार्ड आज मैदानावर उतरला आणि तेव्हा ब्राव्हो त्याच्या पाया पडला