IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. पण, रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू या अनुभवी खेळाडूंनी मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले. पण, डॅनिएल सॅम्सने CSKचे ढाबे दणाणून सोडले. KKR विरुद्धच्या सामन्यात याच सॅम्सची पॅट कमिन्सने बेक्कार धुलाई केली होती. त्याने आज ४ विकेट्स घेतल्या. इशान किशनने ( Ishan Kishan) घेतलेला कॅच हा कॅच ऑफ दी मॅच ठरला.
मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन यांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) अपयश आले. सूर्यकुमार यादव ( ३२), पदार्पणवीर हृतिक शोकिन ( २५), जयदेव उनाडकट ( १९) व किरॉन पोलार्ड ( १४) यांनी योगदान दिले. १९ वर्षीय तिलक वर्माने अखेरपर्यंत खिंड लढवताना ४३ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या आणि मुंबईला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. मुकेश चौधरीने १९ धावांत ३, ड्वेन ब्राव्होने ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनर व महिष थिक्साना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबई इंडियन्सविरुद्ध ब्राव्होने सर्वाधिक ३३ विकेट्स घेतल्या. उमेश यादवे पंजाब किंग्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
प्रत्युत्तरात चेन्नईलाही पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. डॅनिएल सॅम्सने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडला गोल्डन डकवर बाद केले. CSKने मोईन अलीच्या अनुपस्थितीत मिचेल सँटनरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. त्याने काही सुरेख फटकेही खेळले, परंतु सॅम्सने ११ धावांवर त्याचीही विकेट घेतली. रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू या अनुभवी जोडीने संघर्ष करताना CSKला पॉवर प्लेमध्ये २ बाद ४६ धावांपर्यंत पोहोचवले. ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पदार्पणवीर हृतिक शोकीनने स्वतःच्याच गोलंदाजवर उथप्पाचा झेल टिपला. पण, उथप्पा मैदानावरच उभा राहिला. तिसऱ्या अम्पायरने उथप्पाला नाबाद दिले. पोलार्ड व रोहित यांनीही या निर्णयावर नाराजी प्रकट करताना मैदानावरील अम्पायरकडे दाद मागितली.
उथप्पाला त्यानंतर फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. जयदेव उनाडकटच्या चेंडूवर मारलेला मोठा फटका डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या हाती झेल जाऊन बसला. उथप्पा ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेला ( १४) इशान किशनने अप्रतिम झेल घेऊन माघारी पाठवले. पदार्पणवीर हृतिकने ४ षटकांत २३ धावा देत प्रभावी गोलंदाजी केली. सॅम्सने आणखी एक धक्का देताना रायुडूला ४० धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. पोलार्डने त्याचा झेल टिपला. सॅम्सने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या.
पाहा इशानने घेतलेला अफलातून झेल