IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : मुंबई इंडियन्सचीआयपीएल २०२२मधील विजयाची पाटी कोरीच राहिली. अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला. १९ वर्षीय तिलक वर्मा ( Tilak Varma) व गोलंदाज डॅनिएल सॅम्स ( Daniel Sams) यांनी मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले होते. पण, महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अखेरच्या चार चेंडूवर सामना फिरवला. ६, ४, २, ४ अशी फटकेबाजी करून धोनीने चेन्नईला ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन यांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) अपयश आले. सूर्यकुमार यादव ( ३२), पदार्पणवीर हृतिक शोकिन ( २५), जयदेव उनाडकट ( १९) व किरॉन पोलार्ड ( १४) यांनी योगदान दिले. १९ वर्षीय तिलक वर्माने ४३ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या आणि मुंबईला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. मुकेश चौधरीने १९ धावांत ३, ड्वेन ब्राव्होने ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात चेन्नईलाही पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. डॅनिएल सॅम्सने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडला गोल्डन डकवर बाद केले. CSKने मोईन अलीच्या अनुपस्थितीत मिचेल सँटनरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. त्याने काही सुरेख फटकेही खेळले, परंतु सॅम्सने ११ धावांवर त्याचीही विकेट घेतली. रॉबिन उथप्पा (३०) व अंबाती रायुडू ( ४०) या अनुभवी जोडीने अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. पण, दोघंही माघारी परतले आणि CSK बॅकफूटवर फेकले गेले. शिवम दुबेला ( १४) इशान किशनने अप्रतिम झेल घेऊन माघारी पाठवले. पदार्पणवीर हृतिकने ४ षटकांत २३ धावा देत प्रभावी गोलंदाजी केली. सॅम्सने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या.
१८ चेंडूंत ४२ धावांची गरज असताना ड्वेन प्रेटोरियस व महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर होते. उनाडकटने टाकलेल्या १८व्या षटकात दोघांनी १४ धावा जोडल्या. आता CSKला १२ चेंडूंत २८ धावा करायच्या होत्या. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रेटोरियला रन आऊट करण्याची संधी रोहितने गमावली. ही विकेट मिळाली असती तर मॅच फिरली असती. बुमराहच्या त्या षटकात ११ धावा आल्याने आता CSK ला अखेरच्या षटकात १७ धावा करायच्या होत्या. उनाडकटने अखेरच्या षटकात प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने खणखणीत षटकार खेचला. नंतर चौकार खेचला. २ चेंडूवर ६ धावा असताना धोनीने दोन धावा घेतल्या. अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून धोनीने चेन्नईचा विजय पक्का केला.