इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होणाऱ्या पहिल्या संघाचा मान मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) जवळपास पटकावलाच आहे. चेन्नई सुपर किंग्सने थरारक लढतीत विजय मिळवताना मुंबईच्या सलग सातव्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. आयपीएलच्या एका पर्वात सलग सात सामने हरणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला आहे. सर्वाधिक पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चाहतेही प्रचंड निराश आहेत.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात माफक लक्ष्य उभारूनही मुंबई इंडियन्स विजय मिळवतील असे अखेरच्या षटकातपर्यंत वाटले होते. पण, महेंद्रसिंग धोनीने चार चेंडूंत सामना फिरवला अन् मुंबईचा पराभव निश्चित केला. धोनीने २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर CSKच्या डग आऊटमध्ये आनंदाचे वातावरण होते. कर्णधार रवींद्र जडेजाने मैदानावर धाव घेत धोनीला मुजरा केला. तेच आणखी एक पराभव पाहून रोहित शर्माचा चेहरा पडला. त्याचा चेहरा रडवेला झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
पाहा व्हिडीओ...
सामन्यात नेमके काय झाले? मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या नाबाद ५१ आणि सूर्यकुमार यादव( ३२) व हृतिक शोकीन ( २५) यांच्या धावांच्या जोरावर ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा व इशान किशनला माघारी पाठवले आणि त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसची विकेट घेत मुंबईचे कंबरडे मोडले. ड्वेन ब्राव्होने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात चेन्नईची अवस्थाही वाईट झाली होती. रॉबिन उथप्पा ( ३०) व अंबाती रायुडू ( ४०) यांनी डाव सावरला, परंतु MIच्या डॅनिएल सॅम्सने ( ४-३०) तो पुन्हा कोसळवला. महेंद्रसिंग धोनीने मॅच फिनिशरची भूमिका चोख वटवताना १३ चेंडूंत नाबाद २८ धावा चोपल्या. ड्वेन प्रेटोरिसनेही २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. चेन्नईने हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला.
पाहा मॅच हायलाईट्स