मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सनंचेन्नई सुपर किंग्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईनं दिलेलं ९८ धावांचं आव्हान मुंबईनं १५ व्या षटकांत पार केलं. त्यामुळे मुंबई पाठोपाठ आता चेन्नईच्या संघाचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आयपीएल इतिहासात एकाच पर्वात हे दोन यशस्वी संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यासोबतच या सामन्यात दोन्ही संघानी मिळून एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला मुंबईच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये एकापाठोपाठ एक धक्के दिले. पॉवरप्लेमध्ये चेन्नईनं पाच फलंदाज गमावले. सॅम्स, बुमराह, मेरेडिथ यांनी पहिल्या ६ षटकांत भेदक मारा केला. त्यामुळे अवघ्या २९ षटकांत चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं नाबाद ३६ धावांची खेळी साकारल्यानं चेन्नईला ९७ धावा करता आल्या. मुंबईकडून डॅनियल सॅम्सनं ३, मेरेडिथ, कार्तिकेयनं प्रत्येकी २ गडी बाद केले.
मुंबईच्या सुरुवातीच्या फलंदाजांनीदेखील चेन्नईच्या फलंदाजांचा कित्ता गिरवला. त्यामुळे मुंबईचा संघ ४ बाद ३३ असा अडचणीत आला. ईशान किशान, रोहित शर्मा, डॅनियल सॅम्स, त्रिस्तान स्टब्स स्वस्तात माघारी परतले. चेन्नईनं पॉवरप्लेमध्ये ५ फलंदाज गमावले होते. मुंबईचे ४ फलंदाज पॉवरप्लेमध्ये बाद झाले. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यात दोन संघांचे मिळून ९ फलंदाज पॉवरप्लेमध्ये तंबूत परतले.
चेन्नई एक्स्प्रेस मुंबईसमोर घसरलीचेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईसमोर नांगी टाकण्याची परंपरा कायम आहे. आयपीएलच्या मागील दोन पर्वांमध्येही चेन्नईनं मुंबईविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ५ गडी गमावले होते. २०२० मध्ये पॉवरप्लेमध्ये चेन्नईची अवस्था ५ बाद २४ झाली होती. २०२१ मध्येही चेन्नईनं हीच कामगिरी करून दाखवली. त्यानंतर आज त्यांनी पॉवरप्लेमध्ये ५ गडी गमावून ३२ धावा केल्या.