IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा निरोप विजय मिळवून घेतला. दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी ५ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला. पण, गुणतालिकेतील १०वे स्थान MI ला काही चुकवता आले नाही. DC च्या या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( RCB) प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याने सहकाऱ्यांवर खापर फोडले.... टीम डेव्हिड शून्यावर असताना DRS न घेण्यामागच्या निर्णयावर रिषभने धक्कादायक उत्तर दिले.
जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah)ने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीच्या ४ बाद ५० धावा धाल्या होत्या. रोव्हमन पॉवेल ( ४३) व रिषभ पंत ( ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या. मयांक मार्कंडेने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर हृतिक शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. रमणदीप सिंगने २ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्सला एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा २ धावांवर माघारी परतला, परंतु डेवॉल्ड ब्रेव्हिस व इशान MIच्या डावाला आकार देत होते. इशान व ब्रेव्हिस यांनी ३७ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. इशान ३५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. ब्रेव्हिस ( २५) झेल उडाला होता आणि रिषभने तो सोडला. शार्दूलने ब्रेव्हिसची ( ३७) विकेट मिळवून दिली. शार्दूलने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रेव्हिस त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात टीम डेव्हिड ( ०) झेलबाद होता, परंतु रिषभने DRS घेतला नाही. चेंडू डेव्हिडच्या बॅटला टच झाल्याचे अल्ट्राएजमध्ये दिसले आणि DC च्या डगआऊटमध्ये साऱ्यांनी डोक्यावर हात मारला.
याच डेव्हिडने ११ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३४ धावा करून सामना मुंबईच्या पारड्यात आणून दिला होता. मुंबईला विजयासाठी ५ धावा हव्या असताना तिलक वर्मा २१ धावांवर माघारी परतला. २०व्या षटकात खलिल अहमदने पहिला चेंडू नो बॉल फेकला आणि त्यावर DC ला फ्री हिट मिळाले. रमणदीपने चौकार खेचून मुंबईचा विजय पक्का केला. दिल्लीचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले.
रिषभ पंत काय म्हणाला?''या संपूर्ण सामन्यात आम्ही वर्चस्व गाजवले होते, परंतु आम्ही हातचा सामना गमावला. यंदाच्या स्पर्धेत हे आमच्यासोबत वारंवार घडले. या सामन्यात माझ्यावर दडपण नव्हते, परंतु रणनीतीची अमंलबजावणी आणखी चांगली करता आली असती. आम्ही या चुकांतून शिकलो आहे आणि पुढच्या वर्षी आणखी दमदार पुनरागमन करू. आज आम्हाला ५-७ धावा कमी पडल्या,''असे रिषभ म्हणाला...
DRS न घेतल्याच्या मुद्यावर रिषभने सांगितले की, मला वाटलेलं की चेंडू व बॅट यांचा संपर्क झाला आहे, परंतु सर्कलमध्ये उभे असलेल्या खेळाडूंना खात्री नव्हती. मी त्यांना विचारले की DRS घ्यायचा का, पण कोणीच काही म्हणालं नाही आणि शेवटी मी DRS घेतला नाही.
टीम डेव्हिडची मॅच विनिंग खेळी