मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभवाचा जबर धक्का दिला. १४व्या षटकापर्यंत मुंबईच्या हातात असलेला सामना तळाच्या अक्षर पटेल ललित यादव जोडीने तोंडचा पळवून नेला. मुंबई इंडियन्स इशान किशनच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद १७७ पर्यंत मजल मारली होती. हे आव्हान दिल्लीच्या संघाने १० चेंडू राखून आणि चार गडी राखून पूर्ण केलं.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी सलामीवीर इशान किशन या दोघांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. रोहित वेगाने फलंदाजी करत असताना ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला. अनमोलप्रीत सिंग (८) स्वस्तात बाद झाला. एन तिलक वर्माने ३ चौकार मारले पण तो २२ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्ड (३), टीम डेव्हिड (१२) हेदेखील फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. पण इशान किशनने मात्र नाबाद ८१ धावा कुटल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. टीम सिफर्ट (२१), मनदीप सिंग (०) आणि रिषभ पंत (१) स्वस्तात बाद झाले. पृथ्वी शॉ (३८) आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी (२२) छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. त्यानंतर १४व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या कशीबशी शंभरीपार पोहोचली होती. तेव्हाच अक्षर पटेल आणि ललित यादव जोडीने हल्लाबोल केला. ललित यादवने नाबाद ४८ तर अक्षर पटेलने नाबाद ३८ धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला.