IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळतोय.. आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा ( GT) सामना करताना कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma) बॅट चांगलीच तळपताना पाहयला मिळतेय. रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि त्याचे षटकार पाहून स्टँडमध्ये उपस्थित असलेला बॉलिवूड अभिनेता रणविर सिंह ( Ranveer Singh ) हाही फुल एन्जॉय करताना दिसला. रोहितने आजच्या दमदार खेळीने आयपीएलमधील मुंबई इंडियन्सकडून 200 षटकार पूर्ण केलेच, शिवाय डेव्हिड वॉर्नरचा मोठा विक्रम मोडला.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय गुजरातच्या अंगलट आला होता, ती चूक हार्दिकने आता सुधारली. हार्दिकने संघात मात्र कोणताच बदल केलेला नाही. मुंबईच्या संघात एक बदल झाला असून मुरुगन अश्विन आज हृतिक शोकिनच्या जागेवर खेळणार आहे.
रोहित व इशान किशन यांनी मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. इशान डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळताना दिसला, तेच रोहित त्याच्या पुर्वीच्या फॉर्मात परतला. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या पर्वातील पॉवर प्लेमधील सर्वोत्तम खेळी नोंदवली. मुंबईने पहिल्या 6 षटकांत 63 धावा चोपल्या आणि त्यात रोहितने 24 चेंडूंत 42 धावा केल्या. रोहितने मोहम्मद शमीने टाकलेला चेंडू गुडघ्यावर बसून सीमारेषेपार टोलवला अन् रणवीर सिंह आनंदाने जल्लोष करू लागला. रोहितने आज आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले. रोहितच्या नावावर 5807* धावा आहेत, तर वॉर्नर 5805 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत विराट कोहली 6499 व शिखर धवन 6153 धावांसह आघाडीवर आहेत. ( पाहा IPL 2022 - MI vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)