IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : १०८३ दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर परतलेल्या मुंबई इंडियन्सचा जोश परतलेला पाहायला मिळाला. पण, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने यजमान MI ला तोडीसतोड उत्तर दिले. लोकेश राहुलने MI च्या गोलंदाजांची पुन्हा धुलाई करताना यंदाच्या पर्वातील दुसरे शतक झळकावले. आयपीएलमधील त्याचे हे चौथे, तर मुंबईविरुद्धचे तिसरे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक १० धावांवर बाद झाला. लोकेश राहुल संयमी खेळ करताना दिसला आणि तो विकेट टिकवून ठेवताना लखनौचा धावफलक हलता ठेवत होता. ९व्या षटकाच्या दुसऱ्या षटकात लोकेश राहुलला रन आऊट करण्याची संधी रोहितकडून थोडक्यात हुकली. त्याने मनीष पांडेसह ( २२) दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. लोकेशने ३७ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेशची ही ८ वी 50+ धावांची खेळी ठरली आणि त्याने सुरेश रैनाचा ( ७) विक्रम मोडला. लोकेशने मुंबई इंडियन्सविरुद्ध ८०च्या सरासरीने ८००+ धावा पूर्ण केल्या.
मार्कस स्टॉयनिस भोपळ्यावर बाद झाला. पोलार्डने लखनौला आणखी एक धक्का दिला. कृणाल पांड्याही १ धावेवर बाद झाला. कृणालची विकेट घेतल्यानंतर पोलार्डने हाताची घडी घालून सेलिब्रेशन केलं. लोकेश दमदार खेळ करत होता. त्याने १८व्या षटकात उनाडकतला सलग तीन चौकार खेचले. आकाश बदोनी त्याला चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात केवळ चार धावा दिल्या. त्याने चार षटकांत ३१ धावा देत १ विकेट घेतली. लोकेशनहे ६१ व्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध तीन शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. त्याने २०१९ मध्ये वानखेडेवर ६४ चेंडूंत नाबाद १००, यंदा ब्रेबॉर्नपाठोपाठ ( १०३*) वानखेडेवर शतक झळकावले.
लोकेश ६२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०३ धावांवर नाबाद राहिला. लखनौने ६ बाद १६८ धावांचा डोंगर उभा केला.