Mumbai Indians Wankhede IPL 2022, MI vs LSG : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात मुंबई इंडियन्स आज तरी पहिल्या विजयाची नोंद करेल अशी चाहत्यांना आशा आहे. सलग सात पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचे IPL 2022च्या प्ले ऑफच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहेत. पण, तरीही पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ विजय मिळवून ताठ मानेनं स्पर्धेचा निरोप घेईल अशी भाबडी आशा आहे. त्यात आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खास आहे, कारण आज MIचा मेंटॉर व महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा वाढदिवस आहे आणि जवळपास १०८३ दिवसानंतर मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावरील पुनरागमन आणि सचिन तेंडुलकरचा बर्थ डे दणक्यात साजरा करण्यासाठी सारे सज्ज आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी आणखी एकदा खेळणार आहे, तर गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद यांनाही भिडणार आहे. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत -०.८९२ नेट रनरेटसह १०व्या क्रमांकावर आहे. त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सातही सामने जिंकावे लागतील. पण, तरीही त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ही 0.134% आहे.
रोहित शर्माची बॅट अजून हवी तशी तळपलेली नाही, परंतु वानखेडेवर त्याचा फॉर्म परत येईल, अशी अपेक्षा आहे. येथे रोहितने ३४.६६च्या सरासरीने १७३३ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८मध्ये येथे त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ९४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी खेळली होती.
संभाव्य संघ मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड/टीम डेव्हिड, हृतिक शोकिन/मयांक मार्कंडे, जयदेव उनाडकत, डॅनिएल सॅम्स, रिली मेरेडिथ, जसप्रीत बुमराह
लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे/के गौथम, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई