Join us  

मुंबई इंडियन्सचे रडगाणे सुरूच, पंजाब किंग्ज १२ धावांनी विजयी 

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आवश्यक धावगती आवाक्यात आल्यानंतरही मुंबई इंडियन्सने मोक्याच्या वेळी फलंदाज गमावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 7:42 AM

Open in App

पुणे :

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आवश्यक धावगती आवाक्यात आल्यानंतरही मुंबई इंडियन्सने मोक्याच्या वेळी फलंदाज गमावले. यामुळे पंजाब किंग्जविरुद्ध मुंबईला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे यंदाच्या सत्रातील मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

पंजाबने दिलेल्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डीवाल्ड ब्रेविसने केवळ २५ चेंडूत ४९ धावांचा चोप देताना मुंबईला पुनरागमन करून दिले. त्याने राहुल चहरच्या एकाच षटकात ४ षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सावरले. तिलक वर्मा आणि किएरॉन पोलार्ड यांचा सूर्यासोबतचा ताळमेळ चुकल्याने मोक्याच्या वेळी धावबाद होऊन परतले. येथून पंजाबने मिळविलेली पकड अखेरपर्यंत कायम राखली. ओडियन स्मिथने अखेरच्या षटकात ३ बळी घेतले.

त्याआधी, कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी  शानदार अर्धशतक ठोकले. पहिल्या षटकापासून मयांक आणि धवन यांनी पॉवर प्लेमध्ये ६५ धावांचा तडाखा दिला. यामुळे मुंबईकर खेळाडूंवरील दबाव स्पष्टपणे दिसून आला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मुरुगन अश्विनला मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. दोघांनी ५७ चेंडूत ९७ धावांची सलामी दिली. यानंतर जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन झटपट परतल्याने पंजाबचा वेग मंदावला. परंतु, धवनने पुढाकार घेत फटकेबाजी केली. 

- रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज ठरला असून, विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. - आयपीएलमध्ये ८०० वेळा चेंडू सीमापार धाडणारा (चौकार व षटकार) धवन पहिला फलंदाज ठरला. - १५ व्या षटकात जसप्रीत बुमराहने अचूक यॉर्कर टाकत स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला अप्रतिम त्रिफळाचित केले.

निर्णायक क्षण- ११ व्या षटकात स्फोटक फलंदाजी केलेला डीवाल्ड ब्रेविस बाद झाल्याने मुंबईची धावगती मंदावली.- सूर्यकुमारने एक टोक सांभाळून मुंबईच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, १९ व्या षटकात रबाडाने त्याला बाद केले आणि सामना पंजाबच्या बाजूने झुकला. 

सामनावीर : मयांक अग्रवाल

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्स
Open in App