IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : मुंबई इंडियन्सला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाचवेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबईला पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सपाठोपाठ MI नेही पराभवाचा चौकार खेचला. अनुज रावत आणि विराट कोहली हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
मुंबई इंडियन्ससाठी आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला... रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्यानंतर पुढील २९ धावांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे बिनबाद ५० वरून मुंबईची अवस्था ६ बाद ७९ अशी झाली. सूर्यकुमार यादवचे आगमन झाले आणि सामन्याचे चित्रच बदलले. सूर्यकुमार यादवने ७व्या विकेटसाठी जयदेव उनाडकतसह ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मुंबईला ६ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले.
इशान किशन ( २६), रोहित शर्मा ( २६), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ८), तिलक वर्मा (०), किरॉन पोलार्ड ( ०) व रमणदीप सिंह ( ६) हे आज अपयशी ठरले. RCB कडून हर्षल पटेल ( २-२३) व वनिंदू हसरंगा ( २-२८) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक अप्रतिम रन आऊट केला आणि आकाश दीपने एक बळी टिपला.
प्रत्युत्तरात अनुज रावत ( Anuj Rawat ) आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिले षटक संयमाने खेळून काढल्यानंतर दुसऱ्या षटकानंतरच फटकेबाजी सुरू केली. रावतने दुसऱ्या षटकात जयदेव उनाडकतला मारलेले दोन खणखणीत षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. रावतची फटकेबाजी आणि फॅफचा संयमी खेळ याने मुंबईचे गोलंदाज हैराण झाले होते. या दोघांनी ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. उनाडकतने ९व्या षटकात फॅफल ( १६) बाद केले. त्याआधी किरॉन पोलार्डने रावतला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली आणि हीच विकेट मुंबईला महागात पडली. रावत व विराट कोहली यांनीही तुफान फटकेबाजी केली. १७व्या षटकात रावत धावबाद झाला. त्याने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली. त्याने विराटसह ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली.
डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या गोलंदाजीवर विराट LBW झाला. अम्पायरच्या या निर्णयावर विराट नाराज दिसला. त्याने ३६ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने सलग दोन चौकार खेचून RCBचा विजय पक्का केला.