IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : सुरुवातीला केलेल्या चुकांनंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना राजस्थान रॉयल्सच्या धावांवर चाप लावला. सुरूवातीला संयमी खेळणाऱ्या जोस बटलरने अखेरच्या षटकांत गिअर बदलला, परंतु त्याचेही वादळ मुंबईच्या गोलंदाजांनी थोपवून लावले. आज पदार्पण करणाऱ्या कुमार कार्तिकेयने ( १-१९) RRच्या धावा रोखल्या. जसप्रीत बुमराह, डॅनिएल सॅम्स यांनीही टिच्चून मारा केला. हृतिक शोकीनचे १ षटक वगळले, तर त्यानेही चांगली गोलंदाजी केली होती. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी योग्य पार पाडली आता फलंदाजांची वेळ आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होणारा पहिला संघ ठरलेला मुंबई इंडियन्स आता प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळत आहे. पण, पहिल्या तीन षटकांत राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीरांना जीवदान देत त्यांनी अपयशानेच सुरूवात केली. दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू जोस बटलरने हवेत टोलावला, सीमारेषेवर डॅनिएल सॅम्सने झेप घेत तो टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला लागून तो चौकार गेला. त्यानंतर तिसऱ्या षटकात देवदत्त पडिक्कलचा सोपा झेल टीम डेव्हिडने टाकला. अशी सुरूवात झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) निराश झाला.
पाचव्या षटकात रोहितच्या चेहऱ्यावरील हसू परतले. युवा गोलंदाज हृतिक शोकीनने RRला पहिला धक्का देताना पडिक्कलला ( १५) किरॉन पोलार्डच्या हाती झेलबाद केले. कर्णधार संजू सॅमसनने सुरुवातच भारी केली आणि शोकीनला दोन खणखणीत षटकार खेचले. आज मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या कुमार कार्तिकेयने पहिल्याच षटकात RRला धक्का दिला. ७ चेंडूंत १६ धावा करणाऱ्या संजू सॅमसनला त्याने बाद केले. टीम डेव्हिडने यावेळेस चूक न करता झेल घेतला. डॅनिएल सॅम्सचा वेगवान बाऊन्सर जोस बटलरच्या हेल्मेटवर आदळला अन् RRच्या काळजाचा ठोका चूकला. त्या घटनेनंतर बटलरही बचावात्मक मूड मध्ये गेला.