IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सने अखेर ८ पराभवानंतर विजयाची चव चाखली. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चा अपयशाचा पाढा कायम राहिला असला तरी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) त्याला बर्थ डेचं विजयी गिफ्ट दिले. मुंबई इंडियन्सने ५ विकेट्स राखून राजस्थान रॉयल्सवर ( MI vs RR) विजय मिळवून गुणांचे खाते उघडले. मुंबई इंडियन्सनं आज खऱ्या अर्थाने सांघिक खेळ केला आणि त्याचा फायदा झालेला दिसला. सूर्यकुमार यादवला तिलक वर्माची ( Tilak Varma) दमदार साथ लाभली. या दोघांना तीन चेंडूंत युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा यांनी माघारी पाठवून सामन्याला कलाटणी दिली होती. पण, टीम डेव्हिडने त्याची भूमिका चोख वटवली. या विजयामुळे मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा जीवंत झाल्या का? Mumbai Indians have finally got the first 2 point
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने थर्ड मॅनला षटकार खेचून MIच्या चाहत्यांना आश्वासक चित्र दाखवले, परंतु तिसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणून RR ने मोठा डाव खेळला. अश्विनने फिरकीच्या जाळ्यात रोहितला अडकवले आणि डॅरील मिचेलने सोपा झेल घेत त्याला २ धावांवर माघारी पाठवले. किशन १८ चेंडूंत २६ धावा करून ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडिन्ससाठी खिंड लढवली. ८व्या षटकात युजवेंद्र चहलने त्याला LBW केले होते, पण मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले आणि अम्पायर कॉलमुळे तो नाबाद राहिला.
दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या देवदत्त पडिक्कलला ( १५) जीवदान मिळवूनही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार संजू सॅमसन ( १६), डॅरील मिचेल ( १७) हेही अपयशी ठरले. त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण वाढले. जोस बटलर खेळपट्टीवर होता, परंतु मुंबईच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्याला धावा करता आल्या नाही. बटलरने ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. रियान पराग ( ३) अपयशी ठरल्यानंतर आर अश्विनने ९ चेंडूंत २१ धावा करून योगदान दिले. शिमरोन हेटमायरने १४ चेंडूंत ६ धावा केल्याने RRच्या धावा कमी राहिल्या. रिले मेरेडिथने अखेरचे षटक चांगले फेकले, अश्विनच्या विकेटसह त्याने केवळ ३ धावा दिल्या. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. मरेडिथने व हृतिक शोकीनने यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Play Off चं समीकरण....मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून गुणखाते उघडले असले तरी ते १०व्या क्रमांकावरच राहणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स ४ गुणांसह ९व्या क्रमांकावर आहेत. सलग ८ सामने गमावल्यामुळे मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स ( १४), राजस्थान रॉयल्स ( १२), लखनौ सुपर जायंट्स ( १२), सनरायझर्स हैदराबाद ( १०) व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १०) हे आघाडीवर आहेत.