Jos Buttler, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १९३ धावा कुटल्या. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरचं झंझावाती शतक आणि संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर यांच्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली. मुंबई इंडियन्सकडून टायमल मिल्सने सर्वाधिक ३ बळी टिपले, तर पोलार्डने सर्वाधिक ४६ धावा दिल्या.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या तीन षटकापर्यंत हा निर्णय योग्य वाटला. यशस्वी जैस्वाल (१) आणि देवदत्त पडीक्कल (७) स्वस्तात बाद झाले. पण जोस बटलरने तुफान फटकेबाजी केली. चौथ्या षटकात त्याने बेसिल थंपीला २६ धावा झोडल्या. त्याला संजू सॅमसनने चांगली साथ दिली. २१ चेंडूत ३० धावांवर तो बाद झाला. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने दमदार फटकेबाजी केली. त्याने पोलार्डच्या एका षटकात २६ धावा लुटल्या. त्याने १४ चेंडूत ३५ धावा केल्या. पण जोस बटलरने मात्र १९व्या षटकापर्यंत तग धरत दमदार शतक लगावले. बटलरने ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह १०० धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सतर्फे टायमल मिल्सने ३५ धावांत सर्वाधिक ३ बळी टिपले. जसप्रीत बुमराहने १७ धावांत ३ बळी घेतले. बेसील थंपीने एका षटकात २६ धावा दिल्या. पोलार्डनेदेखील ४ षटकात ४६ धावा दिल्या. तसेच, फिरकीपटू मुरूगन अश्विनलादेखील ३ षटकात ३२ धावा पडल्या.