IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सने अखेर ८ पराभवानंतर विजयाची चव चाखली. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चा अपयशाचा पाढा कायम राहिला असला तरी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) त्याला बर्थ डेचं विजयी गिफ्ट दिले. मुंबई इंडियन्सने ५ विकेट्स राखून राजस्थान रॉयल्सवर ( MI vs RR) विजय मिळवून गुणांचे खाते उघडले. हा विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, मुंबई इंडियन्स आज त्यांच्या पूर्ण क्षमतेने खेळली आणि जिंकली. विशेषतः गोलंदाजांनी आज कमाल केली.
राजस्थान रॉयल्सच्या देवदत्त पडिक्कलला ( १५) जीवदान मिळवूनही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार संजू सॅमसन ( १६), डॅरील मिचेल ( १७) हेही अपयशी ठरले. त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण वाढले. जोस बटलर खेळपट्टीवर होता, परंतु मुंबईच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्याला धावा करता आल्या नाही. बटलरने ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. रियान पराग ( ३) अपयशी ठरल्यानंतर आर अश्विनने ९ चेंडूंत २१ धावा करून योगदान दिले. शिमरोन हेटमायरने १४ चेंडूंत ६ धावा केल्याने RRच्या धावा कमी राहिल्या. रिले मेरेडिथने अखेरचे षटक चांगले फेकले, अश्विनच्या विकेटसह त्याने केवळ ३ धावा दिल्या. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. मरेडिथने व हृतिक शोकीनने यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन ( २६) व रोहित शर्मा ( २) लगेच माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव व फॉर्मात असलेल्या तिलक वर्माने मुंबई इंडिन्ससाठी खिंड लढवली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ८१ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार ३९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर माघारी परतला. त्याच्या पुढील षटकात प्रसिद्ध कृणाने दुसरा सेट फलंदाज तिलक वर्मा ( ३५) याला बाद केले. टीम डेव्हिड व किरॉन पोलार्ड या नव्या जोडीवर दडपण वाढलेले दिसले, पण काही चेंडू खेळून काढल्यानंतर डेव्हिडने षटकार खेचून ते दडपण थोडे कमी केले. या दोघांनी २३ धावांत ३३ धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबईला ४ धावा हव्या असताना कुलदीप सेनने पहिल्याच चेंडूवर पोलार्डला ( १०) माघारी पाठवले. पण, डॅनिएल सॅम्सने षटकार खेचून मुंबईचा पहिला विजय पक्का केला. टीम डेव्हिड ९ चेंडूंत २० धावांवर नाबाद राहिला.
रोहित काय म्हणाला?या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, आज आम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने खेळलो. या पर्वात आमचा प्रवास निराशाजनक झाला आणि असं असताना नेमकी कोणती प्लेइंग इलेव्हन खेळवावी, हे सूचत नाही. पण, आम्ही प्रयत्न केले आणि सर्वोत्तम संघ मैदानावर उतरवला. अनेक सामन्यांत आम्ही विजयाच्या जवळही आलो होतो.