IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनीही आक्रमक सुरुवात केली. रोहितचे षटकार पाहण्यासारखे होते. स्टँडमध्ये सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरची ( Sara Tendulkar) उपस्थिती लक्षवेधी ठरली. रोहित व इशान SRHच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होते. रोहितचे षटकार आज चाहत्यांसाठी स्पेशल ट्रीट होती. ही जोडीच आज मुंबईला विजय मिळवून देईल असे वाटत होते, परंतु ११व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने महत्त्वाची विकेट मिळवून दिली. रोहितला पुन्हा एकदा अर्धशतकाने हुलकावणी दिली आणि तो ३६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. पुढच्या षटकात उम्रान मलिकने MIचा दुसरा ओपनर इशान किशन याला माघारी पाठवले. इशानने ४३ धावा केल्या.
तत्पूर्वी, उम्रानने ९व्या षटकात १ चेंडूंत ९ धावा दिल्या. उम्रानने टाकलेला पहिला चेंडू स्टम्प्सच्या बाहेर फुलटॉस पडला आणि त्यावर इशानने एक बाय धाव धावल्या. दोन धावा अशाच आल्या. त्यानंतर पुढचा चेंडू व्हाईड पडला आणि अम्पायरने एका बाऊन्सची ताकीद दिली. पुढील चेंडू उम्रानने बाऊन्सर टाकला आणि तो रोहितच्या हेल्मेटला लागून चौकार गेला. एवढ्या अतिरिक्त धावा दिल्यानंतर चौथा चेंडू अधिकृत पडला आणि त्यावर लेग बाईजची एक धाव आली. अशा प्रकारे एका चेंडूंत त्याने ९ धावा ( 2n-b, 1w, 5nb, 1lb) दिल्या, पंरतु एकही धाव बॅटीतून आली नाही. त्यानंतर १५व्या षटकात उम्रानने MIला आणखी एक धक्का देताना तिलक वर्माला ( ८) झेलबाद केले. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रियाम गर्गने अप्रतिम झेल टिपला आणि डॅनिएल सॅम्स १५ धावांवर माघारी परतला. मुंबईच्या ४ बाद १२४ धावा झाल्या होत्या. ( पाहा IPL 2022 - MI vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
प्रियाम गर्ग ( Priyam Garg) , राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पळता भुई करून सोडले... अभिषेक ( ९) तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. गर्ग व त्रिपाठी यांची ४३ चेंडूंवर ७८ धावांची भागीदारी १०व्या षटकात संपुष्टात आली. गर्ग २६ चेंडूंत ४२ धावांवर माघारी परतला. पूरन २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह ३८ धावांवर बाद झाला. त्रिपाठी ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. पूरन व त्रिपाठी यांनी ४२ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली.
डॅनिएल सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीप सिंगने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या. जसप्रीतने २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा उडवून मोठा विक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला. या विक्रमात भुवनेश्वर कुमार ( २२३) व जयदेव उनाडकट ( २०१) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.