Sachin Tendulkar urges struggling Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत MIला पराभव पत्करावा लागला. महेंद्रसिंग धोनीच्या मॅच फिनिशर इनिंग्जने मुंबईच्या पहिल्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. धोनीने अखेरच्या चार चेंडूंवर १६ धावा करून चेन्नईला थरारक विजय मिळवून दिला. आयपीएल २०२२ मधील मुंबईचा हा सलग सातवा पराभव ठरला आणि आयपीएलच्या एकाच पर्वात सलग सात पराभव पत्करणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला.
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघाची ही अवस्था पाहून सारेच स्तब्ध झाले आहेत. अशात मुंबई इंडियन्सचा मेंटॉर व महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना सल्ला दिला आहे. तो म्हणाला,''आपण कठीण काळातून जात आहोत, परंतु आपण एकत्र राहिले पाहिजे आणि मग एक संघ म्हणून प्रवास करायला हवा''.
दरम्यान, MI चे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनीही फॉर्ममध्ये नसलेले सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांना आगामी सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,''त्यांची कामगिरी चढ-उतारांची झाली आहे. इशानने पहिल्या दोन सामन्यात खरोखरच चांगली फलंदाजी केली आणि नंतर थोडी घसरण झाली. रोहितही चांगले फटके मारतोय, परंतु तो मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरतोय.''