CSK captain MS Dhoni's Master Move for IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यावर शिक्कामोर्तब झाले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत IPL 2022 खेळवण्यात येणार आहेत आणि साखळी फेरीचे ७० सामने महाराष्ट्रातील चार स्टेडियम्सवर खेळवण्यात येतील. बीसीसीआयनं याची घोषणा केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याने मोठा डाव टाकला. मुंबई इंडियन्सपाठोपाठ आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं CSKच्या नावावर आहेत. कर्णधार धोनी याचे नेतृत्व कौशल्या साऱ्या जगाला माहित्ये आणि त्याची निर्णयक्षमताही सारे ओळखून आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २०, ब्रबॉर्न स्टेडियमवर १५, नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर २० आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर १५ सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी चार सामने वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियमवर खेळतील आणि तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होतील. १० संघ प्रत्येकी १४ सामने खेळतील ( ७ होम व ७ अवे ). साखळी फेरीत ७० सामने होतील आणि त्यानंतर प्ले ऑफचे चार सामने होतील. प्रत्येक संघ पाच संघांशी दोनवेळा आणि उर्वरित चार संघांशी एक वेळा खेळेल. प्रत्येक संघ आपापल्या गटातील संघांशी प्रत्येकी दोनवेळा खेळतील आणि दुसऱ्या गटातील एकाच रांगेत असलेल्या संघाशीही दोन सामने होतील, तर उर्वरित संघांशी प्रत्येकी एकवेळा खेळतील.
बीसीसीआयची घोषणा अन् महेंद्रसिंग धोनीनं हलवला CSK चा तळ...बीसीसीआयने आयपीएल २०२२च्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात खेळवण्याचे जाहीर केल्यानंतर धोनीनं CSK चे सराव शिबीर चेन्नईहून सुरतला हलवण्यास सांगितले. चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलआधी २० दिवस सुरत येथे सराव करणार आहे आणि धोनीच्या या निर्णयामागे मास्टर मुव्ह आहे. सुरतच्या लालभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवर CSK चे खेळाडू सराव करणार आहेत. नुकतेच या स्टेडियमवच्या खेळपट्टी तयार करण्यात आल्या आणि त्यासाठी मुंबईच्या मातीचा वापर केला गेला आहे. धोनीला हे समजताच त्याने CSKचा ट्रेनिंक कॅम्प चेन्नईहून सुरत येथे हलवला.
''महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टार्स या सराव सत्रात सहभागी होणार आहेत. सुरतच्या या स्टेडियमसाठी मुंबईच्या मातीचा वापर करण्यात आला आहे आणि त्यामुळे या फ्रँचायझीने येथे सराव करण्याचा निर्णय घेतला,''असे सुरत जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव नैनेश देसाई यांनी सांगितले.
चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिराला २ मार्चपासून सुरूवात होईल. २५-३० खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मेडिकल स्टाफा, CSK चे व्यवस्थापकीय सदस्य, नेट बॉलर्स सुरतसाठी रवाना होणार आहेत.
गटवारी
- ग्रुप अ - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
- ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स
- चेन्नई सुपर किंग्सचा संघ हैदराबाद, बंगळुरू, पंजाब, गुजरात व मुंबई यांच्याशी प्रत्येकी दोन, तर कोलकाता, राजस्थान, दिल्ली व लखनौ यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).