इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी ( IPL 2022) १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन पार पडणार आहे. सर्व संघांनी आपापले तीन ते चार खेळाडू निश्चित केले आहेत आणि आता उर्वरित खेळाडूंनी लिलावात सहभाग घेतला आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) संघ आपल्या ताफ्यात कोणाला घेतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या मेगा ऑक्शनची रणनीती ठरवण्यासाठी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) गुरूवारी चेन्नईत दाखल झाला. येथे CSKच्या व्यवस्थापनासोबत तो मेगा ऑक्शनची रणनीती ठरवणार आहे आणि त्यानंतर ऑक्शनसाठी बंगळुरूत दाखल होणार आहे.
मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. या खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. २०१८नंतर हे पहिलेच मेगा ऑक्शन असणार आहे. आयपीएलच्या या पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी आल्यानं हे मेगा ऑक्शन होत आहे. दहा फ्रँचायझींनी आतापर्यंत ३३८ कोटी रुपये खर्च करून ३३ खेळाडूंना करारबद्ध केले आहे आणि आता २१७ खेळाडूंसाठी ५६०.५ कोटींचा वर्षाव लिलावात होताना दिसणार आहे. १२१४ पैकी फक्त २१७ खेळाडूंना आयपीएलची लॉटरी लागणार आहे आणि त्यात ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. या १२१४ खेळाडूंमध्ये २७० खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहेत, तर ९०३ खेळाडू अनकॅप आहेत. ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेचे सदस्य आहेत.
''हो धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. तो येथे ऑक्शनबाबत चर्चा करण्यासाठी आलेला आहे. ऑक्शनलाही तो उपस्थित राहण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम निर्णय हा त्याचा असेल,''असे सूत्रांनी सांगितले. चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी) यांना आपल्या ताफ्यात कायम राखले आहेत आणि उर्वरित संघंबांधणीसाठी त्यांच्याजवळ ४८ कोटी रक्कम शिल्लक आहे.
महेंद्रसिंग धोनीची ही अखेरची आयपीएल स्पर्धा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कदाचित धोनी CSKचे कर्णधारपद रवींद्र जडेजाच्या हाती सोपवण्याची शक्यता आहे. ''या संदर्भात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. धोनी हा आमचा कर्णधार आहे आणि तो CSK चा पहिला खेळाडू आहे व कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा तोच घेईल. आता आमचे सर्व लक्ष ऑक्शनवर आहे,''असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
Web Title: IPL 2022: MS Dhoni reaches Chennai as Chennai Super Kings begin IPL Auction preparations
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.