मुंबई - रवींद्र जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्सची कप्तानी एमएस धोनीकडे सोपवण्यात आली. त्यानंतर धोनीने आपल्या नेतृत्वगुणांचं कौशल्य दाखवत चेन्नईच्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयानंतर चेन्नई सुपरकिंग्सच्या पाठिराख्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे या हंगामानंतर धोनी निवृत्त होणार की नाही? आता खुद्द धोनीचेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जेव्हा धोनी सीएसकेचा कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी उतरला तेव्हा त्याला विचारण्यात आले की, तू पुढच्या हंगामातही पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार का? त्यानंतर धोनीने कुठलेही आढेवेढे न घेता सांगितले की, फॅन्स त्याला पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीमध्येच पाहतील. मात्र धोनीने त्यापुढेही एक गोष्ट सांगितली.
त्याने पुढे सांगितले की, तुम्ही मला आयपीएलच्या पुढच्या हंगामामध्येही पिवळ्या जर्सीमध्येच पाहाल. आता ती जर्सी हीच असेल का वेगळी हे कुणालाही माहिती नाही. त्यानंतर धोनी म्हणाला की, आम्हाला सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले पाहिजे. आम्ही क्षेत्ररक्षणादरम्यान खूप झेल सोडत आहोत. त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. त्याच्या नेतृत्वाच चेन्नईचा संघ चार वेळा आयपीएल जिंकला आहे. सर्वप्रथम २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईनं विजेतेपद पटकावलं.