Rohit Sharma Mumbai Indians IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'च्या संघाला पहिल्या सामन्यात 'दिल्ली कॅपिटल्स'ने पराभवाचा जबर धक्का दिला. १४व्या षटकापर्यंत मुंबईच्या हातात असलेला सामना तळाच्या अक्षर पटेल - ललित यादव जोडीने तोंडचा घास पळवून नेला. मुंबईने ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर १७७ पर्यंत मजल मारली. हे आव्हान दिल्लीच्या संघाने १० चेंडू राखून आणि चार गडी राखून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सने २०१३ पासून सलग १०व्यांदा हंगामातील पहिला सामना गमावला. पण त्यानंतर रोहित शर्माने फारसा ताण किंवा दडपण न घेता लेकीसोबत वेळ घालवला.
रोहित आणि त्याची लेक समायरा यांचा एक फोटो त्याची पत्नी रितिकाने शेअर केला. रोहित दुपारी सामना खेळला. त्यानंतर संध्याकाळी सर्व खेळाडू आपापल्या रूमवर परतल्यानंतर रोहितने आपल्या लेकीसोबत छान वेळ घालवला. "हंगामाची सुरूवात पराभवाने झाल्यामुळे मी आणि सहकारी निराश झालो, पण ही केवळ सुरूवात आहे, शेवट नाही", असं मत रोहितने सामन्यानंतर व्यक्त केलं.
--
दरम्यान, मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा (४१) आणि सलामीवीर इशान किशन (नाबाद ८१) यांच्या खेळीच्या जोरावर १७७ धावा केल्या. एन तिलक वर्माने ३ चौकार मारत २२ धावांची उपयुक्त खेळी केली. १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १०४ धावांतच दिल्लीचे ६ गडी तंबूत परतले होते आणि १४ षटकांचा खेळ झाला होता. पृथ्वी शॉ (३८) आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी (२२) छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या होत्या. १४व्या षटकानंतर अक्षर पटेल आणि ललित यादव जोडीने हल्लाबोल केला. ललित यादवने नाबाद ४८ धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने नाबाद ३८ धावांची खेळी केली. या दोघांनी अशक्यप्राय वाटणारं लक्ष्य १० चेंडू राखून पार केलं.