मुंबई : ‘ मी रोहित शर्माचा चाहता आहे. त्यामुळेच जेव्हा आयपीएल पदार्पणात त्याच्याकडून संघाची कॅप मिळाली, तेव्हा माझा आत्मविश्वास अधिक दुणावला. खेळाचा आनंद घेत सकारात्मक रहा, असा सल्ला देत रोहित कायमच आत्मविश्वास उंचावत असतो,’ असे मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माने म्हटले.
यंदाच्या सत्रात तिलक मुंबईकडून सर्वाधिक ३०७ धावा फटकावणारा फलंदाज ठरला आहे. तिलक म्हणाला की, ‘रोहित कायम सकारात्मक पाठिंबा देतो. तो नेहमी खेळाचा आनंद घेण्याबाबत सांगतो. कोणत्याही परिस्थितीत दडपण घेऊन खेळू नये, असा सल्ला रोहितने दिला आहे.’
संघाच्या कामगिरीविषयी तिलक म्हणाला की, ‘ यंदा मुंबईची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. आम्ही चांगला खेळ करतोय, पण काही चुकांमुळे सामने गमावले. कर्णधार रोहितने माझ्या कामगिरीचे कौतुक केले. खेळामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्याची गरज नसल्याचे त्याने सांगितले.’