Join us  

IPL 2022 New format, BCCI : 'अरे हे काय चाललंय.. यातच आमची दोन वर्ष जातील'; आयपीएलच्या नव्या फॉरमॅटमुळे नेटकरी चक्रावले

साखळी गटात होणार ७० सामने; मुंबई इंडियन्स. चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 9:56 PM

Open in App

IPL 2022 New format, BCCI : क्रिकेट चाहत्यांसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाची बातमी देणारा ठरला. बहुचर्चित IPL 2022 च्या विशिष्ट सामन्यांच्या तारखांसह सर्व १० संघांचे गट निश्चित करण्यात आले. IPL स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. तर २९ मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. गुरुवारी झालेल्या IPL गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या फॉरमॅटप्रमाणे प्रत्येक संघ हा आपल्या गटातील ४ संघांशी दोन-दोन तर दुसऱ्या गटातील ५ संघांशी एक सामना खेळणार असल्याचं स्पष्ट झालं. पण चाहते मात्र या फॉरमॅटमुळे चांगलेच चक्रावल्याचं दिसून आलं.

IPL 2022 चं वेळापत्रक क्रिकेट चाहत्यांना फारसं रूचलं नाही. बीसीसीआयने सर्व गटांतील संघांचे सामने कशाप्रकारे नियोजित केले आहेत हे समजणं चाहत्यांना कठीण जात असल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावर चाहत्यांनी याच मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिलं की, ग्रुप स्टेजच्या सामन्याचं वेळापत्रक समजायलाच दोन वर्षे जातील. तर दुसऱ्याने लिहिलं की, अरे हे काय सुरू आहे... आधीच इंटरेस्ट संपलाय, त्यात ही नवीन पद्धत अजूनच गोंधळात टाकणारी आहे. काहींनी तर प्लेऑफचं काय असाही सवाल केला.

--

--

--

--

साखळी गटात होणार ७० सामने

यंदा मुंबई आणि पुणे येथील चार मैदानांवर साखळी सामने होणार असून १० संघांमध्ये एकूण ७० सामने होतील. प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण नंतर ठरवले जाईल. २०११ प्रमाणे यावेळीही १० संघांची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे वेगवेगळ्या गटात आहेत.

अ गट - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

ब गट - चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयआयपीएल लिलावमुंबई इंडियन्स
Open in App