Join us  

खळबळजनक! IPL 2022 वर भीतीचं सावट! Mumbai च्या Wankhede Stadium ची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती; सुरक्षा वाढवली

खेळाडूंची हॉटेल्स, येण्या-जाण्याचा मार्ग यासह बऱ्याच गोष्टींची दहशतवाद्यांनी पाहणी केल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 1:41 PM

Open in App

Wankhede Stadium, IPL 2022: दहशतवादविरोधी पथकाने (ATS) काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी IPL सामने ज्या ठिकाणी होणार आहेत, त्या ठिकाणांची आणि खेळाडूंच्या हॉटेल्स तसेच त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांची दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. २६ मार्चपासून IPL 2022 स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे, दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीनंतर, वानखेडे स्टेडियम आणि इतर मैदानांवर विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असल्याचे सांगितलं जात आहे.

मुंबई पोलिसांच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेल आणि खेळाडू राहत असलेल्या इतर हॉटेल्सची रेकी केल्याचे उघड झाले असल्याची माहिती फ्री प्रेस जर्नलने दिली आहे. दहशतवाद्यांकडून मिळालेल्या या माहितीनंतर साऱ्यांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. स्टेडियम, खेळाडूंच्या हॉटेलमधील मुक्कामाची जागा, त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामने होणार आहेत.

खेळाडूंच्या बसला कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी विशेष सुरक्षाकडे पुरवण्यात येणार आहे. हॉटेल्समध्येही विशेष सुरक्षा व्यवस्थेसोबतच पंच आणि सामना अधिकाऱ्यांनाही सुरक्षा पुरवली जाणार आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंच्या हॉटेल आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर पार्किंग करण्यास बंदी असणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च ते २२ मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोधक व निकामी पथक आणि राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे.

यंदा IPLचे ७० साखळी सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. त्यापैकी २० सामने वानखेडे स्टेडियमवर तर १५ सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर २० तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये १५ सामने होणार आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबईदहशतवादीएटीएस
Open in App