Join us  

IPL 2022: नव्या नियमांचा खेळाला होईल फायदा, सलामीला माझ्यासोबत किशन खेळेल- रोहित शर्मा

बुधवारी मुंबईचा कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी रोहितने क्रिकेटमधील नव्या नियमांविषयी सकारात्मक चर्चा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 7:06 AM

Open in App

मुंबई : ‘यंदाच्या आयपीएलपासून मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. नवे नियम चांगले असून याचा खेळाला फायदा होईल. मांकडिंग आता वैध झाल्याने फलंदाजाला अधिक सतर्क राहावे लागेल,’ असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. त्याचप्रमाणे, यंदा त्याच्यासह सलामीला युवा फलंदाज इशान किशन येईल, अशी माहितीही रोहितने दिली.बुधवारी मुंबईचा कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी रोहितने क्रिकेटमधील नव्या नियमांविषयी सकारात्मक चर्चा केली. रोहित म्हणाला की, मांकडिंग आता वैध झाले आहे. त्यामुळे गोलंदाज जेव्हा चेंडू टाकेल, तेव्हा प्रत्येक फलंदाजाला सावध राहावे लागेल. यामुळे फलंदाजावरील जबाबदारी अधिक वाढले आहे. शिवाय आता आयपीएलने हा नियम लागू केला असल्याने सर्वांना याचे पालन करावेच लागेल.फलंदाज झेलबाद झाल्यानंतर खेळपट्टीवर येणारा नवीन फलंदाजच स्ट्राइक घेईल, हा नियम चांगला असल्याचे त्याने सांगितले. रोहित म्हणाला की, एखादा फलंदाज झेलबाद झाल्यानंतर यादरम्यान त्याने स्ट्राइक बदलली असली, तरी मैदानात येणारा नवा फलंदाजच स्ट्राइक घेईल, हा नियम मला आवडला. यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल आणि हे योग्यच आहे. तसेच, सामन्यात दोन डीआरएसही घेता येतील. हा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण जितक्या चुका कमी होतील, खेळ तितका चांगला होईल.इशानसह सलामीलासलामी जोडीविषयी रोहित म्हणाला की, मी डावाची सुरुवात करेन. मी आधीपासूनच ही जबाबदारी निभावत आहे. माझ्यासोबत इशान किशन सलामीला खेळेल. मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीबाबत रोहितने सांगितले की, सूर्या सध्या एनसीएमध्ये आहे. त्याच्या तंदुरुस्तीमध्ये प्रगती होत आहे. तो लवकरच संघासोबत जुळेल. पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. पण तो लवकरात लवकर संघात परतेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.मुंबईत खेळण्याचा फायदा नाहीयंदा सर्व साखळी सामने महाराष्ट्रात होणार असून सर्वाधिक सामने मुंबईत होणार आहेत. मात्र, याचा फार मोठा फायदा मुंबई इंडियन्सला होणार नसल्याचे मत रोहितने व्यक्त केले. २०२१चे सत्र भारतात झाले. त्यावेळी काही सामने मुंबईत झाले खरे, पण मुंबई इंडियन्सला मात्र मुंबईत खेळता आले नव्हते. याकडे लक्ष वेधताना रोहित म्हणाला की, यंदा सर्वाधिक सामने मुंबईत होणार असले, तरी याचा आमच्या संघाला फार मोठा फायदा होईल, असे दिसत नाही. यामध्ये अतिरिक्त फायदा होईल, असे काही नाही. मी, पोलार्ड, सूर्यकुमार आणि बुमराह यांनाच मुंबईत सर्वाधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे. दोन वर्षांनी आम्ही मुंबईत खेळणार आहोत. त्याच वेळी इतर संघ गेल्या वर्षी मुंबईत खेळले आहेत. त्यामुळे याचा आम्हाला अधिक फायदा होईल, असे काही नाही. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App