Wankhede Stadium Mumbai: IPL 2022 च्या हंगामाला शनिवारपासून सुरूवात होत आहे. यंदाच्या साखळी फेरीत सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे विभागात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व संघांचे खेळाडू आपापल्या नियोजित हॉटेल्समध्ये दाखल झाले आहेत. अशातच दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी (Terrorists) मुंबईतील वानखेडे स्टेडियमची रेकी झाल्याची माहिती दिली असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होते. या संदर्भात आता मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
IPL 2022 क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडीयम येथील मैदानावर दिनांक २६/०३/२०२२ पासून सुरू होत आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलीसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडीयम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडीयमपर्यंतच्या मार्गांची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नाही. तरी आयपीएल क्रिकेट सामन्यां दरम्यान स्टेडीयमदर, हॉटेलवर आणि मार्गावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त मुंबई पोलीसांकडुन पुरविण्यात येत आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
--
दरम्यान, एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेल आणि खेळाडू राहत असलेल्या इतर हॉटेल्सची रेकी केल्याचे उघड झाले असल्याची माहिती फ्री प्रेस जर्नलने दिली होती. दहशतवाद्यांकडून मिळालेल्या या माहितीनंतर साऱ्यांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. खेळाडूंच्या बसला कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी विशेष सुरक्षाकडे पुरवण्यात येणार आहे. हॉटेल्समध्येही विशेष सुरक्षा व्यवस्थेसोबतच पंच आणि सामना अधिकाऱ्यांनाही सुरक्षा पुरवली जाणार आहे. तसेच, सामन्यादरम्यान खेळाडूंच्या हॉटेल आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर पार्किंग करण्यास बंदी असणार आहे. याशिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च ते २२ मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोधक व निकामी पथक आणि राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे.