IPL 2022 RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स संघाचं (Royal Challengers Bangalore) नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली विजयी सुरूवात करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. बंगळुरूला पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) संघाने अटीतटीच्या लढतीत धूळ चारली. बंगळुरूच्या संघाने डू प्लेसिस (Faf Du Plessis) च्या ८८, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद ४१ आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद ३२ धावांच्या जोरावर २०५ धावांपर्यंत मजल मारली. हे मोठं आव्हान पंजाबच्या संघाने सहा चेंडू आणि पाच गडी राखून पूर्ण केलं. पंजाबच्या संघाकडून वरच्या फळीतील फलंदाजांनी दमदार कामगिरी केलीच, पण मोक्याच्या क्षणी विंडिजचा तगडा ओडियन स्मिथ याने ८ चेंडूत नाबाद २५ धावा कुटून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात असं काही घडलं जे IPL च्या १५ वर्षांच्या इतिहासात या आधी कधीच घडलं नव्हतं.
१५ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं...
बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली. कर्णधार डू प्लेसिसने गोलंदाजांची धुलाई करत ८८ धावांची खेळी केली. इतर खेळाडूंचीही त्याला उत्तम साथ मिळाली. पण या डावात पंजाबच्या संघाने तब्बल २३ धावा अतिरिक्त (Extras) स्वरूपाच्या दिल्या. त्यानंतर पंजाबच्या संघानेही बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तुफानी वेगाने फटकेबाजी करत त्यांनी सामना जिंकला. त्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी दिलेल्या २२ अतिरिक्त धावांचाही मोठा वाटा होता. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल ४५ अतिरिक्त धावा दिल्या. IPL च्या इतिहासात इतक्या अतिरिक्त धावा कोणत्याही सामन्यात देण्यात आलेल्या नव्हत्या.
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास ड्यूप्लेसिस, विराट आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीमुळे बंगळुरूने दोनशेपार मजल मारली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भानुका राजपक्षेने ४३, शिखर धवनने ४३ आणि मयंक अग्रवालने ३२ धावा करत चांगला पाया रचला. त्यानंतर शेवटच्या ५ षटकांत ५० हून अधिक धावांची गरज असताना शाहरूख खानने २० चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. पण विशेष म्हणजे, ओडियन स्मिथने केवळ ८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद २५ धावा केल्या आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.