IPL 2022 Plan B: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. भारतासह जगात सध्या तिसऱ्या लाटेने आणि वेगवेगळ्या व्हेरियंट्सने थैमान घातलं आहे. विविध उपाययोजना आणि लसीकरणाच्या जोरावर सर्वच देश आपलं जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२०मध्ये स्थगित करण्यात आलेल्या अनेक क्रीडा स्पर्धादेखील आता हळूहळू पूर्वीप्रमाणे प्रेक्षकांच्या उपस्थितीत होण्यास सुरूवात झाली आहे. असं असतानाच IPL 2022 च्या आयोजनाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता गेली दोन वर्षे IPL स्पर्धा UAEमध्ये खेळवण्यात आल्या. पण आता मात्र IPL चे आयोजन भारताबाहेर करायचं असेल तर मात्र UAE ऐवजी दोन वेगळ्याच देशांना BCCI ची पहिली पसंती असल्याचं सांगितलं जात आहे.
IPL 2022चा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रातील चार मैदानांवर खेळवण्यात येईल असा BCCI चा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्याजवळील गहुंजे स्टेडियम अशा चार ठिकाणांचा विचार BCCI ने विचार केला आहे असं बोललं जात आहे. मात्र, भारतात एप्रिल २०२२ पर्यंतही कोरोनाचा वेग कमी झाला नाही तर पुन्हा एकदा भारताबाहेर IPL चे आयोजन करावं लागू शकतं आणि अशा वेळी BCCI ने प्लॅन B तयार केला असल्याची चर्चा आहे.
आतापर्यंत BCCI ने कोरोना काळात भारताबाहेर UAE मध्ये IPL आयोजनाला पसंती दिली. पण आता मात्र UAE ऐवजी दोन वेगळ्याच देशांना BCCI ची पसंती असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका अशा दोन पर्यायांचा विचार BCCI कडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. २००९ साली भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्याने त्यावेळी IPL चा हंगाम आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. आता यंदादेखील जर IPL चे आयोजन भारताबाहेर करण्याची वेळ आली तर BCCI या दोन देशांचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या स्थानिक वेळांमध्ये साडेतीन तासांचा फरक आहे. आफ्रिकेत ४.३० वाजता सामना सुरू झाल्यास त्यावेळी भारतात संध्याकाळचे ७ वाजले असतील. अशा परिस्थितीत खेळाडूंना आवश्यक विश्रांती मिळेल. तसेच प्रसारणाचे हक्क घेणाऱ्या ब्रॉडकास्टर्सनाही वेळेत फारसा फरक नसल्याने समस्या येणार नाहीत, असंही सांगितलं जात आहे.