मुंबई : वाईड तसेच उंचीवरून टाकल्या जाणाऱ्या नो बॉल चेंडूबाबत डीआरएस (पंचांच्या निर्णयाची समीक्षा) नियम लागू करायला हवा, अशी मागणी न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेट्टोरी आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर यांनी व्यक्त केले. आयपीएलमध्ये राजस्थान- केकेआर सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेनंतर या दोन्ही खेळाडूंनी मत मांडले आहे.सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थानला अंतिम दोन षटकांत १८ धावांचा बचाव करायचा होता. कर्णधार संजू सॅमसन याने १९ व्या षटकात फलंदाजाने स्वत:चे स्थान सोडल्यानंतरही पंच नितीन पंडित याने दिलेल्या नो बॉलवर आक्षेप नोंदविला. नाराज असताना गंमत म्हणून त्याने ‘रिव्ह्यू’ मागितला. यामुळे वाईड आणि कंबरेच्या वरच्या उंचीच्या नो बॉलबाबत डीआरएसचा वापर करता येईल का, याविषयी चर्चेला तोंड फुटले. याबाबत आरसीबीचे कोच व्हेट्टोरीचे मत असे की, याबाबत कधी विचार झाला असेल, असे वाटत नाही.वाईडसाठी खेळाडूंना डीआरएस घेण्याची परवानगी मिळायला हवी. अशा मोक्याच्या निर्णयासाठी डीआरएस योग्य उपाय ठरावा. केकेआर जिंकेल असे वाटत असताना गोलंदाजांच्या विरोधात काही निर्णय गेले. अशा वेळी चुका सुधारण्यासाठी खेळाडूंकडे काही उपाययोजना असावी. चुका सुधारण्यासाठीच डीआरएसचा वापर सुरू झाला आहे. याआधी दिल्लीविरुद्ध सामन्यातही राजस्थान संघाने कंबरेच्या वरच्या नोबॉलवर आक्षेप नोंदविला होता. मैदानी पंचांनी तो नो बॉल दिला नव्हता. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली होती. यामुळे तणाव वाढला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने फलंदाजांना परत बोलविले होते. सहायक कोच प्रवीण आमरे मैदानावर पोहोचल्यामुळे त्यांना एका सामन्याच्या बंदीची शिक्षा भोगावी लागली होती.सीएसकेचा माजी गोलंदाज ताहिर म्हणाला, ‘डीआरएस का घेऊ नये? सामन्यात गोलंदाजांसाठी विशेष काहीही नसते. फलंदाज तुमच्या चेंडूवर चौफेर फटकेबाजी करीत असेल तर क्रिजच्या बाहेरच्या बाजूने यॉर्कर किंवा लेगब्रेक करण्याशिवाय पर्याय नसतो. हा चेंडू वाईड दिल्यास गोलंदाज अडचणीत येतो. काल नाजूक स्थिती होती. सॅमसन फार नाराज दिसला. हा चेंडू वाईड असो वा नसो, माझ्या मते हा निर्णय वादग्रस्त बनू नये. केकेआर संघ चांगलाच खेळला; पण त्या निर्णयावर ‘रिव्ह्यू’ मिळायला हवा होता.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'वाईड आणि नो बॉल चेंडूसाठी डीआरएस नियम असावा'
'वाईड आणि नो बॉल चेंडूसाठी डीआरएस नियम असावा'
डॅनियल व्हेट्टोरी, इम्रान ताहिर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 8:00 AM