IPL 2022, Yuzvendra Chahal : भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. IPL 2022च्या मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) त्याला रिटेन केले नाही. त्यावेळी त्याला ऑक्शनमध्ये तुला संघात पुन्हा घेऊ, असे आश्वासन दिले गेले होते, परंतु RCBने त्याच्यावर बोलीच लावली नाही. त्यामुळे RCBने आपल्याला दगा दिला असे, त्याला वाटते.
''मी कोणत्या दुसऱ्या संघाकडून खेळेन, असे कधीच वाटले नव्हते. माईक हेसन यांनी मला कॉल केला आणि सांगितले, की आम्ही तीन खेळाडूंना रिटेन करत आहोत. मला रिटेन व्हायचेय की नाही किंवा त्यांना मला रिटेन करायचेय की नाही, हे त्यांनी मला विचारलेही नाही आणि सांगितलेही नाही. त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं सांगितली आणि ऑक्शनमध्ये तुला पुन्हा संघात घेऊ असे आश्वासन दिले. मला पैशांबद्दलही विचारले नही किंवा रिटेन राहण्याची ऑफरही दिली नाही,''असे चहलने TOI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. युझवेंद्र चहलने RCBसाठी ११३ सामन्यांत १३९ विकेट्स घेतल्या. २०१४ ते २०२१ या कालावधीत तो RCBचा सदस्य होता आणि म्हणून त्यांनी ऑक्शनमध्ये बोली न लावल्याने तो अधिक दुःखी झाला. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी त्याच्यासाठी बोली लावली. RRने ६.५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. तो म्हणाला,''RCBने मला विचारलेही नाही. जर त्यांनी मला रिटेन व्हायचे आहे का, असे विचारले असते तर मी होच म्हणालो असतो. माझ्यासाठी RCB पहिले आणि पैसा दुसरा भाग आहे. त्यांनी मला व्यासपीठ दिले, प्रेम दिले आणि पाठिंबा दिला. या संघाशी मी भावनिक नाळ जोडली गेली आहे.''
RR हे चहलचे पहिले घर आहे. २०१०मध्ये तो या संघाचा सदस्य होता. तो म्हणाला,'' २०१०मध्ये मी राजस्थान रॉयल्सचा सदस्य होतो आणि आता मी पुन्हा ताफ्यात दाखल झालो आहे. तेव्हा मला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जवळपास १० वर्षांनंतर मी संघात परतलोय. आयपीएलमधील हे माझे पहिले कुटुंब आहे. माझा प्रवास या संघाकडून सुरू झाला आहे आणि आता आर अश्विनसोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.''
रोहितबाबत चहलचे मतरोहित शर्मा आजही तसाच आहे. तो मजा मस्करी करणारा कर्णधार आहे. तो युवा खेळाडूंच्या पाठिशी सक्षमपणे उभा राहतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो. तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो, मी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेऊ शकतो. मी त्याला रोहिता म्हणतो, असे चहल म्हणाला.