Delhi Capitals bus attacked by MNS, IPL 2022: हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघ मुंबईत जमायला सुरूवात झाली आहे. मुंबईतील तीन वेगवेगळ्या मैदानांवर लीगचे सामने होणार आहेत. पण त्यापूर्वीच मुंबईत राडा झाल्याचं दिसून आलं. मंगळवारी मुंबईत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसची तोडफोड करण्यात आली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ५-६ कार्यकर्त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड केली.
पोलिसांकडून त्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. सुदैवाची बाब म्हणजे, ही बस पार्किंगमध्ये असल्याने बसमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बसची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत. ताज हॉटेलजवळ उभ्या असलेल्या बसेसची तोडफोड करण्यात केली. आयपीएलमध्ये संघांनी बसचे कंत्राट बाहेरील राज्याच्या म्हणजेच दिल्लीच्या कंपनीला दिल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली. हे कंत्राट स्थानिक कंपनीला म्हणजेच महाराष्ट्राला दिले जायला हवे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतील तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये IPL चे एकूण ५५ लीग सामने खेळवले जातील. हे सामने सीसीआय, डी वाय पाटील आणि वानखेडे मैदानावर होणार असून सर्व संघ मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जमले आहेत. २६ मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे.