‘मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दवाचा परिणाम निर्णायक ठरला. दवाचा परिणाम झाला नसता, तर १५८ धावा विजयासाठी पुरेशा ठरल्या असत्या,’ अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने दिली. मुंबईने या सामन्यात ५ गड्यांनी बाजी मारत यंदाचा आपला पहिला विजय नोंदवला.
अश्विन म्हणाला की, ‘या सामन्यात मोठ्या प्रमाणात दव पडले. त्यामुळे आम्ही १०-१५ धावा कमी केल्या असे वाटले. मुळात आम्ही धावांचे संरक्षण करताना सुरुवात कशी करतो, हे महत्त्वाचे होते. आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि मुंबईच्या तुलनेत एक बळी जास्तही घेतला होता. त्यामुळेच ही आव्हानात्मक धावसंख्या होती आणि यंदा आम्ही जी काही धावसंख्या रचली, त्याचा यशस्वीपणे बचाव केला होता.’
अश्विन पुढे म्हणाला की, ‘जेव्हा दवाचा मोठा परिणाम पडतो, तेव्हा असे होत असते. आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती. जर १०-१५ धावा आणखी काढल्या असत्या, तर चांगले ठरले असते. पण आयपीएलमध्ये कधी कधी अशा गोष्टी घडतात.’