आयपीएलचं यंदाचं सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी म्हणजेच उद्या पहिली लढत होणार आहे. या सामन्यानं यंदाच्या सीझनची सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये वाद निर्माण झाला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया हँडलवरून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतबाबत एक मीम पोस्ट करण्यात आला होतं. कर्णधार संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सनं पोस्ट केलेलं मीम अजिबात आवडलं नाही आणि त्यानं आपली जाहीर नाराजी त्यावर व्यक्त केली. त्यानं संघाला प्रोफेशनल वागण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनानं याची दखल घेत थेट संघाच्या संपूर्ण सोशल मीडिया टीमला काढून टाकलं आहे. संघाचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी लवकरच नवीन टीम नियुक्त केली जाईल अशी घोषणा केली आहे. अर्थात राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडलवरुन जे आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलं होतं ते सॅमसनच्या नाराजीनंतर डिलीट करण्यात आलं. पण तोवर खूप उशीर झाला होता. संघाच्या व्यवस्थापनानं याची गंभीर दखल घेतली आहे.
नेमकं ट्विट काय होतं?
राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडलवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचा बसमधून प्रवास करतानाचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. पण या फोटोसोबत छेडछाड करत एक मीम तयार करण्यात आलं होतं. यात रिषभच्या फोटोवर त्याला कानातले घातले गेल्याचं दाखवलं गेलं होतं. तसंच डोक्यावर एक भली मोठी टोपी आणि नाकावर गॉगल दाखवण्यात आला होता. त्यावर ''क्या खूप लगते हों'', असं कॅप्शन देण्यात आलं होतं. या ट्विटवर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. "आपल्या मित्र मंडळींसोबत असं वागणं एकवेळ योग्य ठरेल. पण संघांनी व्यावहारिक दृष्टीकोन ठेवायला हवा", असं संजू सॅमसननं म्हटलं. यानंतर राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमकडून आक्षेपार्ह ट्विट डिलीट करण्यात आलं.
राजस्थानच्या व्यवस्थापकांनं निवेदन
संपूर्ण घटनेबाबत राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाकडूनही एक निवेदन जारी करण्यात आलं. यात सोशल मीडिया टीम बदलण्याची माहिती देण्यात आली आहे. आज घडलेल्या घटनेची दखल घेत आम्ही संघाच्या सोशल मीडिया टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात सर्वकाही आलबेल असून हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी संघ जोरदार तयारी करत आहे. संघ व्यवस्थापन आपल्या डिजीटल स्ट्रॅटजीचा पुनर्विचार करेल आणि नवी सोशल मीडिया टीम नियुक्त केली जाईल. दरम्यान, आयपीएल आणि संघाच्या चाहत्यांना अपडेट्स हवे असतात याची काळजी घेऊन तातडीनं अंतरिम बदल केले जातील, असं प्रसिद्ध पत्रक राजस्थान रॉयल्स संघाच्या व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आलं आहे.
Web Title: ipl 2022 rajasthan royals statement on sanju samson funny memes saga about rishabh pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.