मुंबई : आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसात लेग स्पिनर युजवेंद्र चहल याला शारीरिक यातना भोगाव्या लागल्या. हा खुलासा खुद्द चहलनेच केल्यामुळे भारतीय संघाचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याची आणि अशा लोकांना पुन्हा मैदानावर येण्याची परवानगी मिळू नये अशी मागणी केली आहे.
चहलने शुक्रवारी रविचंद्रन अश्विनसोबतच्या चर्चेत स्वत:वर बेतलेला प्रसंग कथन करताना खुलासा केला की, तो मुंबई संघात असताना २०१३ ला बेंगळुरू येथे एक सामना होता.
त्यानंतर गेट टुगेदर होते. तेव्हा एक खेळाडू खूप नशेत होता. मी त्याचे नाव सांगणार नाही. तो बराच वेळेपासून मला पाहत होता. त्याने मला बोलावले आणि बाल्कनीत लटकविले. मी माझ्या हाताने त्या खेळाडूच्या मानेमागे हात टाकून डोके पकडले. माझा हात सुटला असता तर... तेव्हा मी १५ व्या मजल्यावर होतो. अचानक तेथे अनेक लोक आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. मी बेशुद्धावस्थेत गेल्याप्रमाणे होतो. त्यांनी मला पाणी पाजले. थोडी चूक झाली असती तर मी १५ व्या मजल्यावरून खाली पडलो असतो.