IPL 2022, Ravi Shastri : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) नव्या भूमिकेसाठी सज्ज आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आणि आता शास्त्री पुढील प्रवासात आयपीएल फ्रँचायझीचे कोच म्हणून दिसण्याची शक्यता आहे. IPL 2022मध्ये नव्यानं दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझी शास्त्री यांना करारबद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यानंतर शास्त्री यांनी बायो बबलवर नाराजी व्यक्त करताना आयपीएल व वर्ल्ड कप यांच्यात पुरेशी विश्रांती आवश्यक होती, असा मुद्दा मांडला.
दरम्यान, शास्त्रींनी आता आयपीएल फ्रँचायझीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले,''आयपीएल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकं काय विचार करतात याची मला पर्वा नाही. आयपीएल ही पैसा देणारी मशीन आहे आणि त्यामुळेच क्रिकेटचे अन्य फॉरमॅट जीवंत राहिले आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्थानिक क्रिकेटसाठी उपयोगी पडतो आणि त्यामुळे स्थानिक क्रिकेट जीवंत आहे.''
NDTVशी बोलताना शास्त्री म्हणाले, भारतीय संघासोबत चार वर्षांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ एंजॉय केला आणि लवकरच नवीन इनिंगचा निर्णय घेईन. त्यामुळे जर आयपीएल फ्रँचायझीसोबत काम करण्याची संधी मिळाली, तर नक्की करेन. त्यात काही दुमत नाही. तो अनुभव चांगला असेल.
रवी शास्त्री यांची टीम इंडियासोबतची साथ...
- २०१४साली रवी शास्त्री यांची आठ महिन्यांकरीता भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये ते मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आणि १६ ऑगस्ट २०१९मध्ये त्यांची फेरनिवड झाली.
- रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय, तर ६५ ट्वेंटी-२०त ४३ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे.
- त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला.
- ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम.