IPL News: महेंद्रसिंग धोनीनं (MS Dhoni) आज सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का देत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधार पदावरुन पायऊतार होण्याची घोषणा केली. त्याचवेळी नव्या कर्णधाराचीही घोषणा करत आपला खास भिडू रविंद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) नाव जाहीर केलं. धोनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. धोनीचा आणखी एक चांगला मित्र आणि सीएसकेचा माजी खेळाडू तसंच मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला गेलेल्या सुरेश रैनानंही (Suresh Raina) आपली भावना व्यक्त केली आहे.
जडेजाची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर सुरेश रैनानं रैनानं एक ट्विट केलं आहे. "माझ्या भावासाठी मी खूप आनंदी आणि तितकाच उत्सुक आहे. आम्ही दोघं या फ्रँचायझीसोबत मोठे झालो आहोत. त्याचं नेतृत्व सांभाळण्यासाठी तुझ्या व्यक्तिरिक्त मी इतर कुणाचा विचार करू शकत नाही. ऑल द बेस्ट जडेजा. हा खूप रोमांचक टप्पा आहे आणि मला विश्वास आहे की तू सर्व अपेक्षा पूर्ण करशील. खूप सारं प्रेम", अशी भावूक प्रतिक्रिया रैनानं दिली आहे. तसंच जडेजाचं खुल्या मनानं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
CSK फ्रँचायझीने IPL रिटेनशन दरम्यान १५ कोटी रुपये खर्चून जडेजाला रिटेन केलं होतं. तर धोनीला १२ कोटी रुपये देण्यात आले होते. आता 14 वर्षांनंतर धोनी व्यतिरिक्त खेळाडू CSK चा कर्णधार होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेनं ४ वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या मोसमाचं विजेतेपद चेन्नई सुपरकिंग्जकडेच आहे. धोनीने एकूण २०४ सामन्यांमध्ये CSK चं नेतृत्व केलं आहे, ज्यामध्ये संघानं १२१ सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेला ८२ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.