मुंबई - आयपीएलमधील दिग्गज संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची या हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यातच चेन्नईच्या संघामध्ये नेतृत्वावरून गोंधळ दिसत असून, अवघ्या ३७ दिवसांतच नवा कर्णधार रवींद्र जडेजाने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यानंतर संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाने हंगामाच्या ऐन मध्यावर चेन्नई सुपरकिंग्सचं कर्णधारपद का सोडलं. याचं कारण आता हळुहळू समोर येत आहे.
काल चेन्नई सुपरकिंग्सच्या व्यवस्थापनाने एक पत्रक प्रसिद्ध करून रवींद्र जडेजाने खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असून, महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केल्याची माहिती दिली. धोनीनेही संघहिताच्या दुष्टीने ही विनंती मान्य केली असून, पुन्हा एकदा नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाला कर्णधारपद सोडावे लागण्यामागच्या कारणाबाबत इनसायडरस्पोर्ट्सने मोठा दावा केला आहे. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सचे प्रमोटर आणि व्यवस्थापन रवींद्र जडेजाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नाजार होते, त्यामुळेच त्याला कर्णधारपद सोडावे लागले, असा दावा करण्यात आला आहे.
यात चेन्नई सुपरकिंग्समधील सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला की, या हंगामामध्ये रवींद्र जडेजा मैदानावर अत्यंत सुस्त आणि ढब्बू दिसत होता. त्याच्या कप्तानीमध्ये धार आणि आक्रमकता दिसत नव्हती. संघाचे कर्णधारपद सांभाळताना त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसत होती.
जडेजाच्या नेतृत्वावर अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनीही टीका केली होती. आयपीएल सुरू होण्याला दोन दिवस असतानाच धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं होतं, त्यानंतर रवींद्र जडेजाला चेन्नईच्या संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आलं होतं. मात्र जडेजाल नेतृत्वाची छाप पाडता आली नाही. अचानक नेतृत्व करावं लागल्याचा दबाव जडेजावर स्पष्टपणे दिसत होता. तसेच खेळाडू आणि कर्णधार अशा दोन्ही पातळ्यांवर त्याची कामगिरी सुमार झाली.
जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या आठ सामन्यात चेन्नईला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे. तसेच प्लेऑफमध्ये त्यांचा प्रवेश होण्याची शक्यताही अंधुक झाली आहे. तसेच जडेजाची कामगिरीही सुमार झाली आहे. त्याला ८ सामन्यात ५ बळी आणि ११२ धावाच काढता आल्या आहेत.