मुंबई - आरसीबीची सिनियर खेळाडू विराट कोहली सध्या कारकिर्दीतील कठीण काळातून जात आहे. काल रात्री हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यातही विराट कोहली शुन्यावर बाद झाला. सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाल्यानंतर आरसीबीनेही तो कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात असल्याचे मान्य केले आहे. मात्र आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी माजी कर्णधार विराट कोहलीचा बचाव केला आहे.
संजय बांगर म्हणाले की, विराट कोहली त्याच्या हातात जे काही आहे, ते सर्व काही करत आहे. मात्र एखाद्या खेळाडूच्या जीवनामध्ये असा काळ येतो जेव्हा त्याच्या बॅटच्या कडेला लागून गेलेल्या पहिल्याच चेंडूला क्षेत्ररक्षक पकडतात. दरम्यान, विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांपासून क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात शतक फटकावता आलेलं नाही. दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत विराट कोहलीला एकही अर्धशतक फटकावता आलेलं नाही.
खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या विराट कोहलीचा बचाव करताना संजय बांगर यांनी सांगितले की, विराट कोहली हा असा खेलाडू आहे. ज्याने आरसीबीसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कुठलाही खेळाडू हा अशा काळातून जातो. विराटने या हंगामाची चांगली सुरुवात केली होती. मात्र एक सामन्यात तो धावबाद झाला. तर एकदा त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडून क्षेत्ररक्षकांच्या हातात गेला.
दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हल्लीच सांगितलं होतं की, विराट कोहली हा थकला आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे. बांगर यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला जास्त महत्त्व दिलं नाही. ते म्हणाले विराट कोहली फिटनेस आणि तंत्रावर मेहनत घेत आहे. तसेच योग्य प्रकारे विश्रांतीही घेत आहे. तो स्वत:वर दबाव वाढू देत नाही आहे.
विराट कोहलीप्रमाणेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. एमएस धोनी मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असून, पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते. तर मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने शेवटच्या ४ चेंडूत १६ धावा ठोकून चेन्नईला विजय मिळवला होता.