Join us  

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : विराट कोहलीचा फॉर्म परतला, RCBने विजय मिळवून Play Offs मधून दोघांना केले बाद; पण, स्वतः अधांतरीच 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आज मनाशी पक्का निर्धार करून मैदानावर उतरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:16 PM

Open in App

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आज मनाशी पक्का निर्धार करून मैदानावर उतरला होता. आयपीएल २०२२मध्ये फॉर्मशी संघर्ष करणाऱ्या विराटने आज गुजरात टायटन्सच्या ( GT) गोलंदाजांची धुलाई केली. तो फटकेबाजी करत असताना फॅफ ड्यू प्लेसिसने दुसऱ्या बाजूने संयमी साथ देत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) विजयाचा भक्कम पाया रचला. विराट व फॅफने ११५ धावांची भागीदारी केली. RCB ने आज दणदणीत विजय मिळवताना प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले, परंतु सनरायझर्स हैदराबाद  ( SRH) व पंजाब किंग्स ( PBKS) यांचे आव्हान संपुष्टात आणले. राजस्थान रॉयल्स १६ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरले. 

प्रथम फलंदाजी करण्याचा गुजरातचा निर्णय चुकला शुबमन गिल ( १), मॅथ्यू वेड ( १६) धावांवर बाद झाले. वृद्धीमान साहा ( ३१) रन आऊट झाला. कर्णधार हार्दिक पांड्या व डेव्हिड मिलर ( ३४) यांनी ४७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली.  राहुल तेवातिया ( २) आज फेल गेला. पण, हार्दिक व राशिद खान यांनी १५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ४७ चेंडूंत ६२ धावांवर नाबाद राहिला. राशिदने ६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद १९ धावा केल्या. गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या. 

विराट कोहलीच्या बाजूने आज नशीब उभे राहिलेले दिसले. अगदी थोडक्यात त्याचा त्रिफळा उडताना वाचला, तर राशिद खानकडून झेलबाद होता होता वाचला. विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ५.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराट आज थांबण्याचं नाव घेतच नव्हता. त्याची फटकेबाजी पाहून वानखेडे स्टेडियमवर विराट नावाचा गजर घुमला. सामन्याच्या ९व्या षटकात साई किशोरच्या गोलंदाजीवर फॅफने मारलेल्या फटक्यावर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट व गोलंदाजाची टक्कर झाली. साई किशोरचा कोना विराटच्या डोक्यावर आदळला आणि काहीकाळासाठी विराट झोपूनच राहिला. पण, आपण तंदुरुस्त असल्याचा सिग्नल त्याने दिला आणि त्यानंतर अर्धशतक पूर्ण केले.

विराट व फॅफ यांची ११५ धावांची भागीदारी १५व्या षटकात संपुष्टात आली. फॅफ ३८ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावांवर हार्दिक पांड्याकरवी झेलबाद झाला. राशिदच्या त्याच षटकात ग्लेन मॅक्सवेल बाद झाला असता. चेंडू यष्टींवर घासून गेला, रंतु बेल्स न पडल्याने तो नाबाद राहिला. त्यानंतर ग्लेनने पुढील षटकात ६, ४, ०, ६ अशी फटकेबाजी केली. राशिद खानने १७व्या षटकात विराटचे वादळ परतवून लावले. विराट ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७३ धावांवर स्टम्पिंग झाला. दरम्यान, विराटने RCB कडून ७००० धावा पूर्ण केल्या. RCBकडून सर्वाधिक धावांचा विक्रमाचा नवा पल्ला त्याने पार केला. एबी डिव्हिलियर्स ( ४५२२) व ख्रिस गेल ( ३४२०) या विक्रमात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  ग्लेन मॅक्सवेलने झटपट फटकेबाजी करून सामना १८.४ षटकांत संपवला. RCB ने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. ग्लेन १८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला.

RCBने या विजयासह पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आणले. या दोघांच्या खात्यात १२ गुण आहेत आणि एक सामना जिंकून ते १४ गुणच कमावू शकतील. राजस्थान रॉयल्स व RCB च्या खात्यात १६ गुण आहेत, परंतु नेट रन रेटच्या जोरावर राजस्थानने स्थान पक्के केले आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यास RCBचे प्ले ऑफमधील स्थान पक्के होईल.

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीगुजरात टायटन्स
Open in App